लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दशकापासून खाकी गणवेश आहे. परंतु एखाद्या दुर्घटनेदरम्यान खाकी रंगाच्या गणवेशामुळे अग्निशमन अधिकारी, पोलीस यांच्यातील फरक स्पष्ट होत नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण राज्यात अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अग्निशमन जवान, अधिकाऱ्यांचा गेल्या १३ वर्षांपासून असलेला खाकी गणवेश इतिहासजमा झाला आहे. आता नवीन गणवेश आला असून, १५ आॅगस्टच्या पथसंचलनात अग्निशमन अधिकारी पांढरे शर्ट, नेव्ही ब्ल्यू रंगांच्या पँटमध्ये तर कर्मचारी आकाशी रंगाचा शर्ट व नेव्ही ब्ल्यू रंगाच्या पँटमध्ये दिसणार आहेत.अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत गणवेशाबाबत माहिती दिली. सध्या २७७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, १५४ कायमस्वरूपी आहेत. ऐवजदार व कंत्राट पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनाही गणवेश दिला जाणार आहे. विभागाचे १३ अग्निशमन केंद्र आहेत. त्यानुसार ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या ८ केंद्र असून, ५५७ पदे मंजूर आहेत. त्यानुसार ४०३ पदे रिक्त आहेत. त्यानुसार गणवेश खरेदी करण्यात आल्याची माहिती उचके यांनी दिली. परिवहन समितीचे सभापती लहुकुमार बेहते, मनपातील भाजपाच्या उपनेता वर्षा ठाकरे उपस्थित होत्या.असा राहील गणवेशनागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी आता पांढरा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पँट, नेव्ही ब्ल्यू पी कॅप, काळा लेदर बेल्ट, काळे लेदर बूट परिधान करतील. कर्मचारीवर्ग आकाशी रंगाचा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पँट, नेव्ही ब्ल्यू बॅरिड कॅप, काळा लेदर बेल्ट, काळा लेदर बूट याप्रमाणे गणवेश परिधान करतील.