नागपूर महापालिका बरखास्तीच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:08 AM2020-02-19T03:08:18+5:302020-02-19T03:08:41+5:30
राज्य सरकारकडून छुप्या सूचना : आर्थिक अनियमितता रेकॉर्डवर आणण्याचे प्रयत्न
कमलेश वानखेडे
नागपूर : गेल्या तीन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका येत्या काळात बरखास्त करण्याच्या हालचाली महाविकास आघाडी सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. यासाठी महापालिका आर्थिक संकटात असल्याचा आधार घेतला जाणार असून सोबतच विविध प्रकल्पांच्या कामात झालेली अर्थिक अनियिमतता शोधून त्या रेकॉर्डवर आणण्याच्या छुप्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
१३ वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सद्यस्थितीत भाजपचे १०८ नगरसेवक असून महाविकास अघाडीतील काँग्रेसचे २९, शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक आहे. राज्यातील भाजपची सत्ता हिसकावल्यानंतर आता महापालिकेतून भाजपला हद्दपार करायचे असेल तर महापालिकेलाच लक्ष्य करावे लागेल, असा आग्रह महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला आहे.
तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील रस्ते बांधकाम घोटाळा उघडकीस आणत शिवसेनेची नाकाबंदी केली होती.
याचे उट्टे काढण्यासाठी त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सिमेंट रोड प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात फसवून भाजपला घेरण्याची रणणिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुकाराम मुंढेशी लोकप्रतिनिधींचे खटके
अभिजित बांगर यांना महापालिका आयुक्त म्हणून १४ महिने झाले असताना त्यांची एकाएक बदली करून तुकाराम मुंढे यांना नागपुरात अणण्यात आले. मुंढे यांचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून लोकप्रतिनिधींशी खटके उडाल्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या माध्यमातून येत्या काळात चौकशीचा सपाटा सुरू होईल, अशी शक्यता आहे.