नागपुरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत घट मात्र रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 09:42 AM2020-10-07T09:42:40+5:302020-10-07T09:45:02+5:30
corona Nagpur News नागपुरात मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८ वर पोहचली. आतापर्यंत ७०,७६७ रुग्णांनी कोविडवर मात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येणार केव्हा, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना कमी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने काहीसा दिलासदायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८ वर पोहचली. आतापर्यंत ७०,७६७ रुग्णांनी कोविडवर मात केली. विशेष म्हणजे, उपचार घेत असलेल्या म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही १० हजारांच्या खाली आली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८३,१०५ व मृतांची संख्या २,६८२ झाली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी होण्याची गरज आहे. परंतु मागील काही दिवसांत चाचण्यांची संख्या मंदावली होती. परंतु आज पुन्हा चाचण्यांचा वेग वाढला. शहरात २९३४ तर ग्रामीणमध्ये २९५ असे एकूण ३२२९ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. शिवाय, रॅपिड अँटिजेन चाचण्या शहरात १,५७९ तर ग्रामीणमध्ये २,९७७ असे एकूण ४,५५६ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. एकूण ७,७८५ चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून ३४२ बाधित रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत ५५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
-बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
मागील दोन आठवड्यांपासून बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. आज १४२५ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ८५.१५ टक्क्यांवर पोहचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण ४१ टक्क्यांवर आले होते. सध्या शहरातील ५६,८९८ तर ग्रामीणमधील १३,८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ९,६५६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-पुन्हा मेडिकलमध्ये एकच रुग्ण बाधित
मेडिकलच्या प्रयोगशाळेत आज ५११ रुग्णांच्या चाचण्यांमधून केवळ एक रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर ५१० रुग्ण निगेटिव्ह आले. मागील चार दिवसांपासून हेच चित्र आहे. या सोबतच एम्समध्ये ३१९ चाचण्यांमधून ३९, मेयोत ७०७ चाचण्यांमधून ६७, माफसूमध्ये ७५ चाचण्यांमधून १९, नीरीमध्ये १९६ चाचण्यांमधून ३५ तर खासगी लॅबमधून १४२१ चाचण्यांमधून ३९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.