नागपुरातील प्लॅटफॉर्म स्कूलच्या अलाद्दीनला मिळाला मायेचा ‘चिराग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:26 AM2018-03-07T11:26:47+5:302018-03-07T11:26:54+5:30
माणुसकीला कुठलाही धर्म नसतो. हीच माणुसकी आणि विश्वास यांच्या बळावर तब्बल सहा वर्षानंतर ‘तो’ कुटुंबीयांना भेटू शकला अन् त्याच्या आयुष्यात परत एकदा सख्ख्या आईच्या मायेचा ‘चिराग’ प्रकटला.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेली सहा वर्षे तो कुटुंबीयांपासून दुरावला होता. डोळ्यासमोर अंधार असताना त्याच्या आयुष्यात एक आशेचा किरण आला. ‘तो’ मुस्लीम अन् आधार देणारा हिंदू. परंतु माणुसकीला कुठलाही धर्म नसतो. हीच माणुसकी आणि विश्वास यांच्या बळावर तब्बल सहा वर्षानंतर ‘तो’ कुटुंबीयांना भेटू शकला अन् त्याच्या आयुष्यात परत एकदा सख्ख्या आईच्या मायेचा ‘चिराग’ प्रकटला.
चित्रपटाचे कथानक शोभावे असाच काहिसा प्रसंग प्लॅटफॉर्म शाळेतील ‘अलाद्दीन’च्या बाबतीत घडला. आज प्रत्यक्ष आईवडिलांना बघून तो भारावून गेला. मात्र तेवढाच भावूकही झाला, कारण आज तो त्याच्यासारख्या अनेक मित्रांपासून पोरका झाला. भाजपचे महामंत्री श्रीकांत आगलावे यांच्या घरात आज मिलन आणि दुरावा हे दोन्ही प्रसंग अनुभवास आल्याने अख्खे वातावरण भावूक झाले होते. मो. अजिम मो. सफीक ऊर्फ अलाद्दीन आज १४ वर्षाचा आहे. तो मूळचा सहारनपूर उत्तर प्रदेशचा. भावाने शाळेत जाण्यास रागावल्याने २०१२ मध्ये त्याने घर सोडले. १५ दिवसांची भटकंती करून, तो मुंबई पोलिसांच्या हाती लागला. घरी परतायचेच नव्हते म्हणून स्वत:चे नावही अलाद्दीन सांगितले आणि ओळखही लपविली. मुंबई पोलिसांनी त्याला नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेत आणून सोडले. नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा अशा मुलांमध्ये संस्कार रुजविणारी, मायेचा ओलावा देणारी, आदर्श व्यक्ती घडविणारी होती. अलाद्दीनसारखे अनेक मुले या शाळेत शिक्षण घेत होते. अलाद्दीन त्यांच्यात रुळला आणि रुजलाही. विशेष म्हणजे या शाळेचा उद्देश भरकटलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी मिळवून देण्याचा होता. परंतु अलाद्दीनने कधीच कुटुंबाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे तो शाळेतच घडत गेला. गेल्यावर्षी ही शाळा बंद पडली. येथील मुलांना श्रीकांत आगलावे यांनी आपल्या घरीच आसरा दिला. त्यांना आपल्या मुलासारखे सांभाळले. श्रीकांतने दिलेले प्रेम, माया, संस्कार, शिस्त यात अलाद्दीनही घरच्यांना विसरला होता.
दरम्यान अलाद्दीनचे वडील मो. सफिक यांनी पाच वर्षे पोराच्या शोधात अर्धा भारत पिंजून काढला आणि अखेर हार मानली. म्हणतात ना ‘उम्मीद की चिराग जिंदा हो, तो खुदा भी राह दिखाही देता है.’ असेच काहीसे घडले. नागपुरातील मुजीब रेहमान यांचे सहारनपूरला व्यवसायानिमित्त येणे-जाणे होते. अशाच आप्तांच्या चर्चेत अलाद्दीनचा विषय निघाला. त्याचा फोटो घेऊन ते नागपुरात आले. काही महिन्यानंतर त्यांची भेट सय्यद सुलतान या आॅटोचालकाशी झाली. बोलताना त्यांनी अलाद्दीनबद्दल सांगितले. सय्यद सुलतान यांचे प्लॅटफॉर्म शाळेशी संबंध होते. त्यामुळे अलाद्दीनचा शोध लागला. लगेच त्याच्या आईवडिलांना कळविण्यात आले. पोराच्या भेटीसाठी आसुसलेले दोघेही नागपुरात पोहचले. आज श्रीकांत आगलावे यांच्या घरी त्यांची गाठभेट झाली.
याद तो आयेंगीच
अलाद्दीनला आज आईवडील मिळाल्याने त्याच्या चेहºयावर आनंदाचे भाव प्रकटले होते. सकाळपासूनच तो खूश होता. परंतु निरोप घेण्याचा प्रसंग आला, तेव्हा श्रीकांत आगलावे यांच्यासह त्याने रवि, पीयूष, वासुदेव, अमित, गणेश यांना गच्च मिठी मारली. यावेळी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. त्याला विचारले तुला आठवेल का हे सर्व. तो म्हणाला यांच्यामुळे जगणे शिकलोय, याद तो आयेंगीच.
राष्ट्रीय एकात्मतेचे खरे उदाहरण आहे
मुलगा आता कधीच परतणार नाही, या भावनेतून आम्ही हार मानली होती. आज त्याला भेटल्यानंतर अतिशय आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद एका हिंदू बांधवाच्या संस्कारी कुटुंबात आनंदाने जगतोय याचा झाला. आज धर्माधर्मामध्ये द्वेषभावना असली तरी, माणुसकीचे हे अप्रतिम उदाहरण आहे. कदाचित हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे.
- मो. सफिक, अलाद्दीनचे वडील
कदाचित अशी अनेक मुले कुटुंबाला भेटली असती
ही मुले माझा परिवारच आहे. या भरकटलेल्या मुलांना त्यांचे आईवडील मिळाले याचे आत्मिक समाधान आहे. जी चळवळ प्लॅटफॉर्म शाळेच्या माध्यमातून मी राबविली होती त्याचा उद्देश सफल झालाय. परंतु शाळा बंद पडल्याचे दु:ख आहे. प्लॅटफॉर्म शाळेच्या माध्यमातून आज अशी भरकटलेली अनेक मुले आपल्या कुटुंबाकडे परतली असती.
- श्रीकांत आगलावे, महामंत्री भाजपा