नागपुरात आता पोलीस घेणार नागरिकांना त्रास न देण्याची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:40 PM2019-11-27T22:40:39+5:302019-11-27T22:42:32+5:30
‘‘मी आज शपथ घेतो की, आजपासून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही. पैसे मागणार नाही किंवा पैशासाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी कुणालाच त्रास देणार नाही’’ अशी शपथ प्रत्येक ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी दररोज घेणार आहेत’’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘‘मी आज शपथ घेतो की, आजपासून पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही. पैसे मागणार नाही किंवा पैशासाठी तसेच अन्य कोणत्याही कारणासाठी कुणालाच त्रास देणार नाही’’ अशी शपथ प्रत्येक ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी दररोज घेणार आहेत’’, होय यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले असून गुरुवारपासून प्रत्येक पोलीस ठाण्यात कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी अशी शपथ घ्यावी लागणार आहे.
पोलीस ठाण्यात एखादी तक्रार घेऊन जाणाऱ्या सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळते, अशी विचारणा केली तर ९९ टक्के लोकांची उत्तरे ‘चांगली वागणूक मिळत नाही, असेच असेल. यातच मागील काही दिवसात पोलीस अधिकारी लाच घेताना ज्या पद्धतीने सापडत आहेत, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या सर्व घटनांना अतिशय गांभीर्याने घेत पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या, अडचणी मांडणाऱ्यांना कसलाही त्रास देणार नाही, अशी शपथ स्वत: पोलिसांना घ्यावी लागणार आहे. गुरुवारपासून प्रत्येक पोलीस ठाण्यात याची सुरुवात होणार असून कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी अशी शपथ घेतील.
एसीबीने तीन दिवसात दोन पोलीस ठाण्यात धडक कारवाई केली. त्यामुळे पोलिसांच्या लाचखोरीची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पाचपावली आणि जरीपटका ठाण्यातील ठाणेदारांची बदली केली. तसेच आणखी काही ठाणेदारांचा पर्याय शोधला जात आहे. इतकेच नव्हे तर ‘पैशासाठी सर्वसामान्य लोकांना त्रास दिला तर खबरदार‘ अशा शब्दातही पोलीस आयुक्तांनी पोलिसांना फटकारले.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शपथविधीचा निर्णय घेतला असून गुरुवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी प्रत्येक ठाण्यात कामकाज सुरू होण्यापूर्वी केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांचा हा निर्णय अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय आहे, परंतु त्यावर अधिकारी व कर्मचारी किती गांभीर्याने अंमलबजावणी करतात हे तर येणारी वेळच ठरवेल.
पोलीस ठाण्याच्या कामाचेही गोपनीय ऑडिट होणार
दरम्यान प्रत्येक पोलीस ठाण्यातील कामकाजाचेसुद्धा गोपनीय ऑडिट करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे हे पोलीस ठाण्यातील कामकाजाचे गोपनीय ऑडिट करणार आहेत.