नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय : मनोरुग्णांची थंड पाण्याने अंघोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:57 PM2018-12-04T22:57:56+5:302018-12-04T23:00:15+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. आता पुन्हा १३ सोलर वॉटर हिटर सिस्टीमधून केवळ एकच सुरू आहे. यामुळे रुग्णांवर पुन्हा थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार
मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र येथील उपचार व सोयींना घेऊन ही सर्वच रुग्णालये नेहमीच चर्चेत राहिली आहेत. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे, यासाठी पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून आठ सोलर वॉटर हिटर सिस्टीम लावण्यात आले. पुण्याच्या एका कंपनीकडे याच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली. परंतु नंतर याकडे लक्षच देण्यात आले नसल्याने सर्वच बंद पडले. दोन वर्षांपूर्वी पाच नवे सोलर वॉटर हिटर सिस्टीम लावण्यात आले. मात्र सध्या यातील एकच सुरू आहे. यामुळे अंघोळीसाठी लागणाऱ्या गरम पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लाकडे जाळून गरम पाणी केले जाते, परंतु रुग्णांची संख्या पाहता सर्वांनाच गरम पाणी देणे कठीण जात असल्याचे चित्र होते.
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. हिवाळी अधिवेशनात यावर तारांकित प्रश्नही उपस्थित झाला. अखेर याची दखल शासनाने घेतली. नागपूरसह इतर चारही मनोरुग्णालयांकरिता एकूण २४ नग सोलर वॉटर हिटर सिस्टीमला मंजुरी दिली. याला अंदाजित खर्च ८४ लाख २४ हजार येणार असून, लवकरच खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यातील सुमारे सहा नग नागपूरच्या मनोरुग्णालयाला मिळण्याची शक्यता होती. परंतु नंतर त्याचे काय झाले, याची माहिती कुणालाच नाही. रुग्णालयाचे नवे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी पदभार स्वीकारताच रुग्णालयातील सोलर सिस्टीमची पाहणी करून दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीला सूचना दिल्याचे समजते.
रुग्णालयातील आठ जुने व पाच नवे सोलर वॉटर हिटर सिस्टीममधून केवळ एक सुरू आहे. रुग्णांना लाकडे जाळून गरम पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक रुग्ण गरम पाण्यानेच अंघोळ करीत आहे. बंद पडलेली सोलर यंत्रणा दुरुस्त करण्याचा सूचना दिल्या आहेत.
माधुरी थोरात
वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय