- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या तीन भामट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. सध्या अटकेत असलेले हे तिघेही चोरटे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
आदर्श मिलींद अंबादे (वय २१, रा. नंगपुरा, जि. गोंदिया) हा सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हावडा एक्सप्रेसच्या प्रवेशद्वारावर संशयास्पद अवस्थेत उभा होता. फलाट क्रमांक ६ वर तैनात असलेले आरपीएफचे पीएसआय एच. एल. मिना तसेच कर्मचारी कपिल झरबडे, नीरज कुमार, चंदन निर्मल, धिरज दलाल आणि दीपा कैथवास तसेच जीआरपीचे प्रवीण खवसे आणि अमोल हिंगणे आणि सतीश बुरडे यांना त्याचा संशय आला. त्यामुळे गाडी फलाटावर थांबताच आरपीएफच्या जवानांनी त्याला खाली उतरवून विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या ताब्यात येताच आरोपीची भंबेरी उडाली. त्याने पोलिसांच्या प्रश्नांवर उत्तर देताना काही वेळेपूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तो पोलिसांच्या हवाली केला. त्याचे दोन साथीदार आणखी रेल्वे स्थानक परिसरात सावज शोधत असल्याची माहितीही मिळाली. त्यावरून आरपीएफच्या पथकाने प्रणय कालूदास ठवरे (वय २१) आणि मयूर उमेश उपाध्याय (वय २२, दोघेही रा. नंगपुरा, गोंदिया) यांनाही पकडले. हे दोघे प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या तयारीत होते. या तिघांनाही प्राथमिक चाैकशीनंतर आरपीएफने सोमवारी रात्री रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हवाली केले. गावातून निघायचे अन् दुसरीकडे हात मारायचाउपरोक्त चोरटे टापटीप होऊन घरून (गोंदियातून) निघतात. धावत्या रेल्वेत किंवा नागपूर स्थानकावर येऊन ते हात मारायचे अन् साळसुदपणे आपल्या गावाकडे परत जायचे. अशा प्रकारे त्यांनी आणखी कोणते गुन्हे केले, त्याचा जीआरपी तपास करत आहे.