नागपूर : १८ टक्के परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची सुमारे ३५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटमधील आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भरत शाहू (२७, भिलगाव), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी परतावा न देता कंपन्यांनी गाशा गुंडाळला होता. या प्रकरणातील आरोपी सुनील कोल्हे व अजय लदवे यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे.
सुशील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे, अजय लदवे व भरत शंकर शाहू यांनी एजीएम कॉर्पोरेशन, एजीएम डिजिटल लिमिटेड, जनसेवा म्युच्युअल बेनिफिट निधी व इतर शेल कंपन्या स्थापन केल्या. यात गुंतवणूक केल्यास १८ महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले, तसेच दुसऱ्या स्कीममध्ये गुंतविल्यास दरमहा अडीच टक्के मुद्दल व अडीच टक्के व्याज ४० महिन्यांपर्यंत मिळत राहील आणि बोनसदेखील देऊ, असा दावादेखील केला. त्यांच्या बोलण्याला फसून नागेंद्रसिंग ठाकूर व इतर अनेक गुंतवणूकदारांनी सुमारे ३५ कोटी रुपये कंपनीत गुंतविले. १८ महिन्यांचा कालावधी संपल्यावर आरोपींनी गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही. उलट त्यांनी कंपन्याच बंद केल्या व पळ काढला. यासंदर्भात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
आर्थिक गुन्हे शाखेने इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सचा आधार घेत भरत शाहू याला अटक केली. त्याची चौकशी करण्यात येत असून, त्यातून आणखी नवे तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.
आकडा आणखी वाढण्याची शक्यता
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या तिघांनी गुंतवणूकदारांना ३५ कोटींचा चुना लावण्याचा अंदाज आहे. मात्र, हा आकडा आणखी वाढू शकतो. एजीएम काॅर्पोरेशन, एजीएम डिजिटल लिमिटेड, जनसेवा म्युच्युअल, बेनिफिट निधी लिमिटेड, संजय ट्रेडर्स प्रा. लिमिटेड डिस्कव्हरी टाइम्स अँड मीडिया, फॅमिली फुडस्, सेल नियरबाय, जनसेवा कॉर्पोरेशन, सक्सेस लाइफ प्रोजेक्ट मल्टिपल मार्केटिंग प्रा. लिमिटेड मोहम्मद असलम हाजी मुन्ना मिया व इतर शेल कंपन्यांच्या नावाखाली त्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते. ज्या नागरिकांनी यात पैसे गुंतविले होते व ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी केले आहे.