नागपुरात वाहतूकदारांच्या संपाचा तिसरा दिवस; जीवनावश्यक वस्तू महाग होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:20 AM2018-07-23T11:20:38+5:302018-07-23T11:21:02+5:30
ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रकमालक व वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होऊ लागला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी भाजीपाला आणि दुधाच्या टँकरची वाहतूक कमी झाली आहे. केंद्र सरकारचे मंत्री संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संप आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. संपाच्या तीन दिवसात नागपुरात वाहतूकदारांचा जवळपास ५० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.
संघटनेने जीवनावश्यक वस्तूंना संपातून वगळले असले तरीही ट्रक मालक आणि वाहतूकदार या मालाची वाहतूक करण्यास मनाई करीत आहेत. संपामुळे आवश्यक वस्तू एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात आणि राज्यातून अन्य राज्यात नेण्यास प्रतिबंध आले आहेत. त्यांचा फटका गरीब, सामान्यांसह व्यापारी आणि शेतकºयांना बसत आहे. अन्य राज्यातून भाजीपाला आणण्यास ट्रक मालकांनी मनाई केली आहे. हा संप आणखी ७ ते ८ दिवस सुरू राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊन किमती आकाशाला भिडतील, अशी भीती मारवाह यांनी व्यक्त केली.
केंद्र शासनाने मागण्या मान्य कराव्या
संपापूर्वी केंद्रीय पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांच्याशी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांनी चर्चा केली होती. पण त्यांनी मागण्या मान्य करण्यास वा चर्चेस मनाई केली. तीन महिन्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आश्वासनाने संप मागे घेतला होता. त्यानंतर सरकारने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुठलीही चर्चा केली नाही. आता चर्चा नाही, तर कृती हवी, असे मारवाह यांनी सांगितले.
वस्तूंच्या महाग किमतीसाठी सरकार दोषी
मारवाह म्हणाले, संपामुळे विविध राज्यातून येणाऱ्या औषधांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये आवश्यक औषध मिळणार नाही. नागपुरात बटाटे कानपूर आणि अलाहाबाद येथून येतात. मिरची आंध्रच्या गुंटूर येथून तर विजयवाडा येथून हळद येते. आता सणासुदीत नारळ आंध्रप्रदेश आणि केरळातून मोठ्या प्रमाणात येतात. संपाचा धान्याच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दुधाचे टँकरही बंद होतील. वाहतूक बंद झाल्यामुळे जीवनाश्यक माल येणार नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे किमती आकाशाला भिडतील. याकरिता केंद्र सरकार दोषी राहील, असे त्यांनी सांगितले.