नागपुरात पायली फटक्यांकडे ग्राहकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:04 AM2018-11-06T00:04:52+5:302018-11-06T00:07:14+5:30
कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांच्या मागणीत घट झाली असून, आकाशात विविध रंगांची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.
दिवाळी हा प्रकाशाचा सण. तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. दुकानात बच्चे कंपनीबरोबर पालकांचीही गर्दी वाढली आहे. लवंगी, भूईचक्र, अनार, रोल व फुलझड्यांशिवाय एकतरी ‘फॅन्सी’ फटाका घेऊन जाण्याचा आग्रह लहान मुले धरताना दिसून येत आहे. ‘पायली’च्या नावाने ओळखले जाणारे ‘फॅन्सी’ फटाके सध्या बाजारात १ इंचापासून ते ४ इंचाच्या पायलीपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. आकाशाता विविध रंगांची उधळण करणाºया या फटाक्याची किंमत ५० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत आहे. यासोबतच ‘सेव्हन शॉट ते ‘वन थाऊझंड शॉट’ फटाका उपलब्ध आहे. याच्या किंमती १०० ते ७ हजार रुपयापर्यंत आहे. यात एकशेवीस शॉट असलेल्या ‘मस्का चस्का’ फटाक्याल्याही यावर्षी चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
चायना फटाक्यांमध्ये यावर्षी ‘गोल्डन येलो’ या फटाक्यात व्हिसलिंग करत पिवळ्या रंगात जळणारे अनार व ‘स्काय एंगल टू इन वन’ यात वेगवेगळ्या रंगात जळणारे अनार, त्याचवेळी आकाशात दुसऱ्या रंगाची उधळण करते. ‘चायना बॉन्टी क्रकलिंग’ हा फटाका विविध आवाज करीत आकाशात झेपावतो. ‘बुलेट ट्रेन’ यात मध्यम आकाराची पायली असून एकाच वेळी बुलेट ट्रेनसारखा आवाज करीत १०० शॉट निघतात. ‘एरियल मल्टी एवनलाँच’ यात एकापाठोपाठ २४० शॉट आकाशात विविध रंगांची उधळण करतात.‘मायाजाल’ ‘चटाचट ज्युरासिक पार्क’ व ‘गील्टरिंग’ हे फटाके विविध आवाज करीत जमिनीवर फुटतात. हे सर्व फटाके १५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रॉकेटमध्ये ‘मिसाईल रॉकेट’ हे यावर्षी लाल आणि हिरव्या रंगात आले आहे. सुतळी, लक्ष्मी बॉम्बच्या मागणीत घट झाली असल्याचे फटाका विक्रेत्याचे म्हणणे आहे. चायना व आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांच्या मागणीत वाढ झाली असली तरी लवंगी, भूईचक्र, अनार, टिकल्या व फुलझड्यांशिवाय दिवाळीचा आनंदच साजरा होत नसल्याने हे फटाकेही आवडीने घेत असल्याचेही चित्र आहे.