नागपूर विद्यापीठ : परीक्षा रद्द करण्याबाबतचा संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 08:28 PM2020-06-05T20:28:18+5:302020-06-05T20:32:31+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत. शिवाय राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत परीक्षा रद्द करायच्या की जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठीची तयारी कायम राखावी हा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दररोज निर्देशांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यासंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार सरकारने ८ मे रोजी परिपत्रक काढले. त्या परिपत्रकात विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या, असे नमूद केले होते. परिपत्रकाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी केली आहे. या परीक्षा कॉलेजस्तरावर असाव्या की विद्यापीठाने घ्याव्या याबाबत जूनच्या अखेरच्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आढावा बैठक घेणार होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. ८ मेच्या निर्देशानंतर विद्यापीठाला परीक्षांबाबत इतर कुठलेही निर्देश राज्य शासनाकडून आलेले नाहीत. केवळ नागपूरच नव्हे तर इतर कुठल्याही विद्यापीठाला असे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण झाला आहे.
बॅकलॉग विद्यार्थ्यांचे काय होणार ?
याशिवाय मागील सत्रांचे विषय बॅक असलेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे हादेखील विद्यापीठासमोर मोठा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या हजारोंनी आहे. या विद्यार्थ्यांना अगोदरच्या सत्रांच्या आधारावर श्रेणी देऊन उत्तीर्ण केले तर ते नियमांचे उल्लंघन ठरेल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता राज्य शासनाकडून नागपूर विद्यापीठाला कुठलेही अधिकृत लेखी निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे तोपर्यंत काहीच बोलणे किंवा अंदाज बांधणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.