नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधरमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’चीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:12 AM2018-02-08T00:12:24+5:302018-02-08T00:17:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत. तीन मोठ्या संघटना मिळून एकत्रितरीत्या उतरलेल्या महाआघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर नव्यानेच मैदानात उतरलेल्या ‘परिवर्तन पॅनल’ने धडाक्यात ‘एन्ट्री’ करत दोन जागांवर विजय मिळविला. तर आरक्षित गटातील चार जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले.
रविवार ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये केवळ ४१.१६ टक्के मतदान झाले. खुल्या प्रवर्गातील ५ व आरक्षित प्रवर्गांमधील ५ अशा एकूण १० जागांच्या मतमोजणी प्रक्रियेला मंगळवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतरदेखील मतमोजणी सुरू होती व बुधवारी रात्री ३ वाजता मतमोजणी पूर्ण झाली. रात्री १ वाजेनंतर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे विष्णू चांगदे, ‘परिवर्तन पॅनल’चे शीलवंत मेश्राम व प्रशांत डेकाटे हे विजयी झाले. मतमोजणीनंतर ‘शिक्षण मंच-अभाविप’ व ‘परिवर्तन’च्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
१८ तास चालली मतगणना प्रक्रिया
मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी कामावर होते. मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली मतगणना प्रक्रिया बुधवारी रात्री ३ वाजेपर्यंत चालली. मतगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाचवेळी चेहऱ्यावर थकवा आणि प्रक्रिया सुरळीतपणे आटोपल्याचे समाधान दिसून येत होते.