लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी मोबाईल अॅप तयार केले असून इंटरनेटच्या नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना पेपर अपलोड करता आला नाही तरी आता घाबरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा स्थितीत थेट विद्यापीठाने दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांक किंवा ई-मेलवर सोडविलेला पेपर पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांसंबंधात विद्यापीठाने उत्तरसूची जारी केली असून त्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान नेटवर्क गेले तरी प्रश्नपत्रिका सोडविणे शक्य होणार आहे. नेटवर्क आल्यानंतर उत्तरे दोन तासांच्या आत सबमिट करता येणार आहे. मात्र या कालावधीनंतरदेखील नेटवर्क येत नसेल तर विद्यार्थ्यांना कागदावर रोल नंबर, विषय, अभ्यासक्रम व मोबाईल क्रमांक लिहून एकाखालोखाल प्रश्न व बरोबर पर्याय लिहिता येणार आहे. हा पेपर ई-मेलवर पाठविता येईल. यादरम्यान, अॅप विद्यार्थ्यांच्या हालचाली, आवाज रेकॉर्ड करत राहील. गैरप्रकार करणाºया विद्यार्थ्यांची नावे थेट व्हिजिलेन्स समितीकडे पाठविण्यात येतील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.संबंधित अॅप हे ‘गुगल प्लेस्टोअर’वर उपलब्ध आहे. हे अॅप विद्यार्थ्यांनी नियमितपणे अपडेट करावे, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राचार्यांशी संपर्क साधावाकाही विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होऊ शकतो. अशा स्थितीत प्रवेशपत्र डाऊनलोड झाले नाही तर महाविद्यालयांतील प्राचार्यांशी संपर्क साधावा. प्राचार्य विद्यापीठ यंत्रणेशी संपर्क साधतील व समस्येचे निराकरण होईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.
अॅपमध्ये अडचण आली तर हे कराविद्यार्थ्यांना अॅपसंदर्भात अडचणी येत असल्यास अगोदर ते अनइन्स्टॉल करावे व त्यानंतर नवीन अॅप डाऊनलोड करावे. महाविद्यालयातून मिळालेल्या हॉल तिकीटमध्ये आणि परीक्षेसंदर्भातील अॅपमध्ये प्रत्येकाने आपले नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर तसेच विषय बरोबर आहेत काय ते तपासून घ्यावे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. महाविद्यालयातून मोबाईल नंबर तसेच नावांमधील असलेला बदल करता येईल. कारण महाविद्यालयातील लॉगिनवरून हे त्वरित करणे शक्य आहे.