लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात ‘कोरोना’चे थैमान सुरू असून नागपूरलादेखील त्याचा फटका बसला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सर्व काही ठीक झाले तर विद्यापीठावर सोबतच सर्व परीक्षा घेण्याचा ताण पडणार आहे. यंदाची एकूण स्थिती लक्षात घेता विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशिरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील.यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. आगामी काळात विद्यापीठाच्या परीक्षा व इतर शैक्षणिक महत्त्वाच्या बाबी या अधिक क्षमतेने आपल्यासह इतर सर्व घटकांना पार पाडाव्या लागतील. जर ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिल रोजी उठले तर परीक्षा या २० एप्रिलपासूनच घ्याव्यात, शिवाय प्राध्यापकांना २ मे पासून पेपर तपासणी बंधनकारक करावी. अगोदर अंतिम वर्षाचे निकाल लावावेत व इतर वर्षांचे वर्ग १ जुलैपासून सुरूकरावेत, अशी मागणी चांगदे यांनी केली आहे. मात्र स्थितीत सुधारणा झाली नाही तर विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्याच परीक्षा घ्याव्या. इतर सर्व परीक्षा जून महिन्यात महाविद्यालय स्तरावर घ्याव्यात. महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी पेपर तपासून त्याचे गुण विद्यापीठाकडे पाठवावेत, अशी सूचना चांगदे यांनी केली आहे.वेळापत्रक जारी केल्यानंतर १५ दिवसांचा वेळ द्या‘लॉकडाऊन’नंतर विद्यापीठाला नवे वेळापत्रक घोषित करावे लागणार आहे. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे बाहेरगावी राहतात. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला वेळ लागू शकतो. शिवाय त्यांना यायलादेखील काही वेळ लागेलच. त्यामुळेच हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा १५ दिवसांच्या कालावधीनंतर घ्याव्यात, अशी मागणी विधिसभा सदस्य अॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. अंतिम वर्षाच्याच परीक्षा विद्यापीठाने घ्याव्या व इतर परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेऊन जुलैपर्यंत निकाल लावावे, ही भूमिका मांडली आहे.