नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:05+5:302021-08-17T04:13:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या लोककलांवंताना शासनाने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोरोना जनजागृतीचे काम ...

Nagpur University will prepare a list of folk artists | नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या लोककलांवंताना शासनाने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोरोना जनजागृतीचे काम देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंताची यादी तयार करण्यात येणार असून, ही जबाबदारी विद्यापीठाच्या मराठी विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या साथीने जगावर संकट आले आहे. साथीचा रोग असल्याने सर्व प्रकारच्या जत्रा, मेळे आणि जलसे यावर बंदी आहे. त्यामुळे राज्यातील लोककलावंतांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लोककलावंतांना त्यांच्या लोककलाप्रकाराच्या माध्यमातून कोरोनाविषयक जाणीव जागृतीचे काम देण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रत्येक जिल्हावार पारंपरिक लोककलावंतांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. राज्यातील विद्यापीठातील मराठी विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी एक समिती तयार करण्याता आली असून, यात प्रत्येक विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील मराठी विभागाकडे नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून ३०० कलावंतांची निवड

५ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील लोककलावंतांना कोरोनाविषयक जाणीव जागृती करण्याचे काम मिळणार आहे. या लोककलांच्या कार्यक्रमातून लसीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा प्रसार व्हावा, हाही यामागे उद्देश आहे. त्यासाठी कार्यक्रम सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रत्येक कार्यक्रमासाठी मानधन मिळणार आहे. वासुदेव-बहुरूपी अशा एकल कलाकारास एका दिवशी ५०० रुपये मिळणार आहेत. एका कलावंताला १० दिवस सादरीकरण करता येईल. प्रत्येक जिल्ह्यातून ३०० कलावंतांची निवड केली जाणार आहे.

लोककलावंतांची माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात येईल. त्यातून निवडलेल्या कलावंतांची यादी संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांद्वारे लोककलावंतांना जनजागृतीची कामे दिली जातील. तेव्हा लोककलावंत किंवा त्यांच्याशी संबंधित परिचितांनी लोककलावंतांची https://forms.gle/ndEGjnyoa6JNLiJt7 या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती भरून द्यावी.

डॉ. प्रमोद मुनघाटे, विभाग प्रमुख, स्नातकोत्तर मराठी विभाग,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Web Title: Nagpur University will prepare a list of folk artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.