नागपूर होणार विमाननिर्मितीचे हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:38 AM2019-08-28T10:38:46+5:302019-08-28T10:39:27+5:30
टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमधील टाल कंपनीसाठी जागा संपादन करण्यास शासनाने पुढाकार घेतला व टाटा समूहाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मिहानमध्ये प्रकल्प सुरू केला. टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (सेझ) ‘टाल’ या टाटा उद्योग समूहाच्या एअरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे उत्पादन सुरू आहे. कंपनीने प्रकल्पातून बोईंग विमानाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या २५ हजार अॅडव्हान्स कम्पोझिट फ्लोअर बीम (एसीएफबी) या पार्टची रवानगी बोईंग कंपनीला मंगळवारी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, टाल कंपनीचे अध्यक्ष विजय सिंग, बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, आयआयआयटी, आयआयएम, सिम्बॉयसिस यासारख्या शैक्षणिक संस्थामुळे नागपूर शैक्षणिक हब म्हणून उदयास आले आहे. येथे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता नाही. या प्रकल्पात स्थानिक युवक कार्यरत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. आणखी युवकांना रोजगार देण्यासाठी कंपनीने विस्तार करावा. टाल कंपनीच्या प्रकल्पात ९० टक्के स्थानिकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे.
राज्य सरकारने मिहानमधील कंपन्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून दिल्यामुळे, मिहानमध्ये औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते व टाल कंपनीच्या संचालन विभागाचे अध्यक्ष यांच्यात एसीएफबी पार्टच्या रवानगी संदर्भातील कागदपत्रांचे हस्तांरण करण्यात आले. सलील गुप्ते यांनी बोईंग व टाल यांची भागीदारी भारताच्या स्किल इंडिया व मेक इन इंडिया अभियानात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात टाल आणि बोईंग इंडियाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.