नागपुरात पावसाची सरासरी कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:02 PM2020-08-05T22:02:25+5:302020-08-05T22:03:18+5:30
बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने परत हजेरी लावली आहे. २४ तासात शहरात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने परत हजेरी लावली आहे. २४ तासात शहरात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीहून १ टक्का अधिक पाऊस झाला असून ही सरासरी कायम राहण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात सरासरीहून अधिक प्रमाणात कोसळल्यानंतर पावसाने विश्रांतीच घेतली होती. दोन दिवसअगोदर शहरात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मंगळवारी दिवसभर पावसाचा फारसा जोर नव्हता व बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २.८ मिमी पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळ पावसाचा जोर जास्त होता. रात्री ८.३० वाजेपर्यंत ७.७ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ११ ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.