आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. राज्यभरातील आमदारांकडून येणाऱ्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव स्वीकारले जात आहे. आजवर विधानसभा व विधान परिषदेसाठी एकूण २५२३ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. आमदारांची सक्रियता पाहता अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.विधानसभेसाठी १७९० लक्षवेधी, ९६७५ तारांकित प्रश्न, १८६ अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव व ४०१ अशासकीय प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अशोक मोहिते यांनी लोकमतशी बोलताना दिली. विधान परिषदेसाठी ७३३ लक्षवेधी, २९१६ तारांकित प्रश्न, १६३ अशासकीय प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावर्षी हिवाळी अधिवेशनात तीन नवे विधेयक व १२ अध्यादेश सादर केले जातील. विधानसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक व विधान परिषदेत प्रलंबित ५ विधेयक देखील सादर होतील.सूत्रांंच्या मते अधिवेशन वाढविण्याचा निर्णय झाला तरी फक्त एक दिवस वाढविले जाईल. २३ डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. २४ डिसेंबर रविवार व २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुटी येत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी तयारी जोरात सुरू आहे. देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढून, धरणे देऊन आपल्या मागण्या, प्रश्न सरकार दरबारी पोहचविण्यासाठी आंदोलक सज्ज झाले आहेत. आजवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा ३५ संघटनांनी पोलिसांकडे मोर्चाची परवानगी मागितली आहे. पटवर्धन मैदानावर धरणे देण्यासाठी १८ संघटनांनी विशेष शाखेकडे अर्ज केले आहेत.साधारणत: अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी मोर्चांची संख्या वाढते. या काळात मोर्चासाठी अधिक परवानग्या मागितल्या जातात. गेल्या आठवड्यापर्यंत मेट्रो रेलच्या बांधकामामुळे पटवर्धन मैदानावर साहित्य पडलेले होते. मैदानावर खड्डे पडले होते. त्यामुळे यावेळी आंदोलकांना जागा कुठे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवत मैदान रिकामे करण्याचे निर्देश मेट्रो रेल्वेला दिले. सोमवारी ४ डिसेंबर रोजी मेट्रोने मैदानाचा उत्तरेकडील भाग समतल केला. आता शनिवारपासून येथे आंदोलकांचे पेंडाल लागण्यास सुरुवात होईल. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे सीताबर्डी आनंद टॉकीज रस्ता मोर्चांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गणेशपेठकडून येणारे मोर्चे धंतोली पोलीस ठाण्यासमोरून यशवंत स्टेडियम व मुंजे चौक मार्गे मोर्चा पॉर्इंटपर्यंत पोोहचतील. मात्र, मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटवर प्री-आयएएस कोचिंग सेंटरच्या समोरील जागेवर मेट्रोचे बांधकाम सुरू असल्यामुळे जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे आता पोलिसांना येथे तंबू लावण्यासाठीही जागा मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत आता टेकडी लाईन मार्गाला लागून असलेल्या जमिनीवर तंबू उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शहर पोलीस विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र अधिवेशन सेल तयार केला आहे. मोर्चे व धरणे आंदोलनाची परवानगी देण्यापासून ते बंदोबस्ताची व्यवस्था सांभाळण्यापर्यंतच्या कामासाठी वेगवेगळी चमू तयार करण्यात आली आहे.कालावधी वाढीवर २० रोजी निर्णयविधीमंडळाच्या अधिवेशनाचा कार्यकाळ ११ ते २२ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी कामगार सल्लागार समितीची बैठक होईल. तीत अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायचा का यावर निर्णय घेतला जाईल.
नागपूर हिवाळी अधिवेशन ; २५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:27 AM
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देअधिवेशन वादळी होण्याची चिन्हेअधिवेशनाच्या कालावधीवर २० डिसेंबरला निर्णय