नागपूर जिल्हा परिषद : विकास पुस्तिकेवरून सीईओंनी अधिकाऱ्याला फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:35 AM2020-01-22T00:35:28+5:302020-01-22T00:36:31+5:30
विषय पुस्तिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुनीच पुस्तिका सीईओंपुढे सादर केल्याने सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विकास कामांची पुस्तिका सादर करायची आहे. विषय पुस्तिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुनीच पुस्तिका सीईओंपुढे सादर केल्याने सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. एवढेच नाही तर आपण कामाप्रती तत्पर नाही़ जिल्हा परिषदेत नुसती दिशाभूल सुरू आहे़ वरिष्ठांना काय जाब द्यायचे, असे अनेकानेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले़
अनेक विभागप्रमुख सहाचा ठोका पडला की कार्यालय बंद करून घरी जातात़ हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही़ मागील आठवड्यात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली़ त्यामध्ये अनेक विभागप्रमुख हे उशिरा आले़ त्यामुळे सीईओंचा चांगलाच पारा सरकला़ दरम्यान, पालकमंत्र्यांनी बैठक बोलाविली आहे़ त्यामध्ये जिल्हा परिषदेला लेखाजोखा सादर करावयाचा आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेची विकास पुस्तिका कुठे आहे? अशी विचारणा सीईओंनी संबंधित विभागाच्या प्रमुखाला केली. त्यांनी जुनी माहिती पुस्तिका समोर केल्याने सीईओंनी त्यांचा अर्धा तास क्लास घेतला़ सीईओंच्या हसतमुख स्वभावातील बदल पहिल्यांदाच विभागप्रमुखांना अनुभवायला आल्याने, ही चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली होती़