नागपूर जिल्हा परिषद : सत्ताधाऱ्यांची सभा; विरोधकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 08:03 PM2020-10-23T20:03:39+5:302020-10-23T20:06:21+5:30
Nagpur Zilla Parishad, Opposition boycott, Nagpur News जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विरोधकांच्या अनुपस्थितीत पार पडली. विरोधकांचा ऑनलाईन सभेला विरोध असल्याने, त्यांनी बहिष्कार घातला. आपला विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे सभा नियमानुसारच पार पडली असा दावा जि.प. अध्यक्षांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विरोधकांच्या अनुपस्थितीत पार पडली. विरोधकांचा ऑनलाईन सभेला विरोध असल्याने, त्यांनी बहिष्कार घातला. आपला विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे सभा नियमानुसारच पार पडली असा दावा जि.प. अध्यक्षांनी केला. मात्र विरोधकांच्या अनुपस्थितीत सभा झाल्याने सभेचा रंगच हरविला. विरोधकांच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचे चांगलेच फावले.
स्थानिक स्वराज्य संस्थेची सभा ही ऑनलाईन घ्यावी, असे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जि.प. प्रशासनाने शुक्रवारी सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन घेतली. पंचायत समिती स्तरावर सदस्यांसाठी ऑनलाईनची सोय केली होती. तर पदाधिकाऱ्यांसह अधिकारी जि.प.च्या सभागृहात उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहातून पदाधिकारी व अधिकारी सदस्यांचे विषय ऐकून घेत असताना, विरोधक मात्र काळ्या फिती लावून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध करीत होते. सभेला विरोधकच नसल्याने सत्ताधाऱ्यांचे चांगलेच फावले. त्यांनी सत्ताधारी सदस्यांचे विषय जाणून घेत, काही ठराव पारित करून सभा पार पाडली.
विरोधकांच्या तक्रारी
ऑनलाईन बैठकीत विषय मांडता येत नाही. आमच्याकडे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहे, ते मांडता येऊ नये म्हणून हे पत्र.
ऑनलाईन सभा होऊ नये म्हणून सीईओंना पत्र दिले होते, त्यांनी पाठपुरावा केला नाही.
विरोधक नसल्यामुळे सभा रद्द करावी.
आम्ही सीईओंनाही पत्र दिले होते. जि.प. प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला असता तर सभा सभागृहात घेणे शक्य झाले असते, पण प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून सभा ऑनलाईन घेतली, त्याचा आम्ही निषेध करतो.
अनिल निधान, विरोधी पक्ष नेता
सभा शासनाच्या नियमानुसारच झाली. ऑनलाईन असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी असतात. विरोधकांनी त्या समजून घ्यायला हव्या होत्या, आपले मुद्दे मांडायला हवे होते. असा पळपुटेपणा करून, ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडविण्याची त्यांनी संधी हिरावली.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.
विरोधकांच्या पक्षाची महापालिकेत सत्ता आहे. तिथेही सभा ऑनलाईन होत आहे. मग जिल्हा परिषदेमध्ये हे शहानपण दाखविण्यात अर्थ काय? हा जाणून केलेला विरोध आहे.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.
ऑनलाईन झालेल्या सभेत तांत्रिक अडचणी असल्यामुळे आवाज स्पष्ट नव्हता. ज्या सदस्यांनी आपले विषय सभेत मांडले, ते प्रोसिडींगमध्ये घेण्यात यावे.
सलील देशमुख, सदस्य, जि.प.
हॅलो हॅलो, बोला बोला
जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितीमध्ये ऑनलाईन सभेसाठी आयोजन केले होते. त्यामुळे काही सदस्या पंचायत समितीमध्ये जावून बसले. काही सदस्य घरातूनच बैठकीत उपस्थित झाले. तांत्रिक अडचणीमुळे सभेच्या शेवटपर्यंत हॅलो हॅलो, बोला बोला हाच सवांद बरेचदा ऐकायला मिळाला.