नागपूर जि.प.तही महाविकास आघाडी! निवडणुका मात्र स्वबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:43 AM2019-11-28T10:43:32+5:302019-11-28T10:43:57+5:30

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे.

Nagpur ZP also leads Mahavikas Aghadi | नागपूर जि.प.तही महाविकास आघाडी! निवडणुका मात्र स्वबळावर

नागपूर जि.प.तही महाविकास आघाडी! निवडणुका मात्र स्वबळावर

Next
ठळक मुद्देभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी फॉर्म्युला वापरणार

मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. संपूर्ण देशभरात महाराष्ट्राने राबविलेला या पॅटर्नची चर्चा होत आहे. सत्तेच्या या नवीन प्रयोगामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. याचे परिणाम यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही होण्याचे संकेत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते हा प्रयोग सत्ता स्थापनेसाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने २०१२ मध्ये महाआघाडीचा प्रयोग राबवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या २२ जागा निवडून आल्या होत्या तर काँग्रेसचे १९ सदस्य निवडून आले होते. पण त्यावेळी भाजपाने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाला सोबत घेऊन महाआघाडी बनविली होती.
त्यामुळे भाजपाला अध्यक्षपद तर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व शिक्षण सभापतिपद दिले होते. शिवसेनेला महिला व बालकल्याण आणि कृषी सभापती व गोंगपाला समाजकल्याण सभापतिपद दिले होते. पण धोरणात्मक निर्णय घेताना, दोघांमध्ये झालेल्या फाटाफुटीने अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडली.२०१२ मध्ये महाआघाडीचा प्रयोग भाजपाने केला होता. पण यंदा हा प्रयोग करण्यासाठी जिल्ह्यात शिवसेना उत्सुक आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण दोन पाऊल पुढे येऊन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू असे शिवसेनेचे बडे नेते सांगत आहे. पण निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना तयार आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा माजी मंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यात सर्वच सर्कलमध्ये शिवसेना लढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडून सांगण्यात येते की, निवडणुकीपूर्वी हे सूत्र न जुळल्यास निवडणूक निकालानंतर अशाप्रकारची जुळवाजुळव शक्य आहे. काँग्रेस सुद्धा याच मानसिकतेत आहे. कारण निवडणुकीपूर्वी महाआघाडी झाल्यास मोठ्या प्रमाणात फाटाफूट होऊ शकते. रामटेकमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. काटोल, हिंगणामध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी हमखास हा प्रयोग करण्यात येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका जोरात सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचे मेळावे व विविध शिबिर घेतले जात आहे. सर्वच जागेवर लढण्यासाठी तयार राहा, असे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काटोल, रामटेक, उमरेड, सावनेर या जागा गमावल्या आहेत. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे भाजपाला निवडणुकीत संपूर्ण ताकद लावावी लागणार आहे. २०१२ च्या आकड्यावरच भाजपा स्थिरावल्यास, त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

आमच्या पक्षामध्ये हा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून निर्देश आल्यानंतर घेतला जातो. पण आम्ही प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत असताना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर हा अजेंडा मांडत आहोत. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातून अभिप्राय आल्यानंतर ते वरिष्ठांना कळविण्यात येतील. ते सांगतील त्या निर्णयावर आम्ही वाटचाल करू.
- राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

हो, हा फॉर्म्युला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राबविला जाईल. निवडणुका लढण्याअगोदर तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. दोन पाऊल मागे घेण्याला कुठल्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला हरकत नसावी. निवडणुकीपूर्वी आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचार विनिमय करू.
- बाबा गुजर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यात झालेल्या महा विकास आघाडीचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चितपणे परिणाम दिसतील. निवडणुकीपूर्वी हा प्रयोग राबविताना कार्यकर्त्यांनाही विचारात घेतले जाईल. कारण कार्यकर्ते पाच वर्ष मतदार संघात काम करतात. कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेऊन निर्णय घेऊ. पण निवडणूक झाल्यानंतर निश्चित हा प्रयोग अंमलात आणू.
संदीप इटकेलवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना

Web Title: Nagpur ZP also leads Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.