लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय व १३ पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता मे महिनाही सुरू झाला असून अद्यापही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत.कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी कास्ट्राईबसह विविध संघटनांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे देयके कोषागार कार्यालयात पाठविता आली नाही, मात्र दोन दिवसात तांत्रिक अडचण दूर करुन पगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज या गोष्टीला १५ दिवस लोटले आहे. मात्र, यानंतरही तोडगा निघाला नाही. संघटनांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्याशी देखील चर्चा करुन कर्मचाऱ्यांच्या भावना अवगत करुन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, तेथूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. एप्रिल महिन्यात सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंत्या होत्या. मात्र वेळेवर पगार न झाल्यामुळे ते साजरे करण्याच्या उत्साहावर विरजण पडले. आता दोन महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जेवढा पगारास विलंब होईल तेवढा घेतलेल्या कर्जावर भुर्दंड बसेल, काढलेल्या आवर्ती ठेवी, विमा, भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावर फरक पडेल. शिवाय पगार देयके पुन्हा जनरेट करुन पुन्हा बीडीएस काढावे लागेल आदी बाबी संघटनेने वेळोवेळी वरिष्ठ अधिकाठयांच्या निदर्शनास आणून देऊन कोषागार कार्यालयात देयके सादर झाल्यानंतर संघटना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही प्रश्न कायम आहे. जि.प.तील काही विभागांना गत मार्च महिन्याचाच पगार मिळाला आहे. तर अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल दोन्ही महिन्याचा पगार प्राप्त झाला नसल्याने कर्मचारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.१ तारखेच्या पगाराचे काय झाले?जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी कर्मचाऱ्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ तारखेला होईल. अशी ग्वाही आपला पदभार स्वीकारल्यानंतर दिली होती. मात्र, आज दोन - दोन महिने पगार मिळत नाही. त्यातल्या त्यात कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश असो अथवा ट्युशन फी हे देखील काम आता कर्मचाऱ्यांना पैसे उधारीवर घेऊन मार्गी लावावे लागत असल्याचे, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.