नागपूरकर गिरवताहेत संविधानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:18 AM2018-09-06T11:18:21+5:302018-09-06T11:23:06+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन संविधान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत नागरिक आता संविधानाचे धडे गिरवू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने पुढाकार घेत वस्त्यांवस्त्यांमध्ये जाऊन संविधान जनजागृती मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत नागरिक आता संविधानाचे धडे गिरवू लागले आहेत. नागपुरात राबविण्यात येत असलेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग असून राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याची जगात ओळख आहे. समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारित हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याचे हक्क प्रदान करतो. परंतु आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या संविधानाबाबतच नागरिकांमध्ये उदासीनता आहे. बहुतांश नागरिकांना संविधानाबाबत फारशी माहिती नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानने यासंदर्भात पुढाकार घेत विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत वस्त्यांमध्ये जाऊन संविधानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रतिष्ठानने एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकारी स्वत: वस्त्यांमध्ये जाऊन संविधान काय आहे. त्यात काय सांगितले आहे. यासंदर्भात नागरिकांना इत्थंभूत माहिती देतात. १ सप्टेंबरपासून या अभियानास सुरुवात झाली असून आतापर्यंत १० वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. यासाठी एक समता रथही तयार करण्यात आला आहे.
वकील, कायदेतज्ज्ञ व अभ्यासकांनीही सहभागी व्हावे
एक जागरूक नागरिक घडावा, या उद्देशातून ही मोहीम राबवली जात आहे. वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही लोकांना संविधान समजावून सांगतो. संविधानाची प्रत वितरित करतो. तसेच शासनाच्या विविध योजनांचीही माहिती देतो. सुरुवातीला शहरातील स्लम भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. सकाळी सर्व लोक आपापल्या कामासाठी निघून जातात त्यामुळे सायंकाळची वेळ निश्चित केली आहे. जागरूक नागरिक निर्माण करण्याच्या या मोहिमेत वकील, कायदेतज्ज्ञ आणि संविधान अभ्यासकांनीही सहभागी व्हावे.
- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मुख्य समन्वयक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान तथा प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण