नागपूरकरांनी जमा केल्या २ हजार कोटींहून अधिक दोन हजारांचा नोटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:49 PM2023-09-30T21:49:45+5:302023-09-30T21:50:04+5:30
बँकांना थेट रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची मुभा : ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर ग्राहकांनी बँकेत नोटा जमा करण्यासाठी आणि बदली करून घेण्यासाठी गर्दी केली. आधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी सव्वा चार महिन्यात २ हजाराच्या जवळपास २ हजारांहून अधिक कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्याची बँकांची अधिकृत माहिती असून ही आकडेवारी ९८ टक्के आहे.
नागपूरकरांनी अखेरच्या आठवड्यात सर्वाधिक नोटा जमा केल्या आहेत. ग्राहकांना नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबर होती. काही सहकारी बँका आणि पतसंस्थांनी २७ सप्टेंबरपर्यंत नोटा स्वीकारल्या आणि त्याच दिवशी रिझर्व्ह बँकेत जमा केल्या. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार १९ मे रोजी देशात ३.४२ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. तर २९ सप्टेंबरपर्यंत ९६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या. अखेरच्या दिवशी ९८ टक्क्यांपर्यंत नोटा जमा झाल्याची माहिती आहे. आता २ टक्के नोटा जमा होणे बाकी आहे. त्यातील काही ७ ऑक्टोबरपर्यंत जमा होतील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
२ हजाराच्या नोटेची चलनातून देवाणघेवाण थांबली
२ हजाराची नोट २९ सप्टेंबरपर्यंत चलनात ग्राह्य धरण्यात येईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर नोट बदलीसाठी अनेकांनी बँकेकडे धाव घेतली आणि नोटा बदलवून घेतल्या किंवा खात्यात जमा केल्या. पण रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर २ हजाराची नोट चलनातून अप्रत्यक्षरीत्या बंद झाल्याचा अनुभव ग्राहकांना १९ मेनंतर येऊ लागला. बाजारात फार कमी लोक या नोटा स्वीकारताना दिसत होते. रिझर्व्ह बँकेने २ हजाराची नोट बँकेत जमा करण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.