लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने २३ व २४ फेब्रुवारीला जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यायला दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. प्रसार माध्यमांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरल्याने जि.प.च्या सीईओंनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. समितीने आपला अहवाल सीईओंकडे दिला आहे. या स्पर्धेच्या आयोजनात अनेक त्रुटी आढळल्या आहेत.आमदार डॉ. माने यांनी हा प्रश्न विधानसभेत लावल्याने, या संपूर्ण प्रकरणाचा तपशील जिल्हा परिषदेला मागितला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. यासंदर्भात समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही सीईओनी कुठलाही निर्णय न घेतल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आता शासनाच्या पत्रानंतर सीईओंना या प्रकरणात योग्य निर्णय घेणे भाग पडणार आहे.विस्तार अधिकाऱ्याचा बळीजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी पाजल्याप्रकरणात विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आयोजनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या त्रुटी आढळल्यानंतरही त्यांना बगल दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनांनी यासंदर्भात फेरचौकशीची मागणी सीईओंकडे केली आहे.स्पर्धेचे नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी थोटेंची नियुक्ती केली होती. तसेच पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना थोटेंच्या सहकार्याकरिता समित्या नियुक्त करण्याचे पत्र दिले होते. या स्पर्धा परीक्षेच्या तोंडावर आल्याने सर्व विस्तार अधिकारी परीक्षेच्या कामात व्यस्त असल्याने समित्याच स्थापन करण्यात आल्या नाही. त्यामुळे संपूर्ण आयोजनाची जबाबदारी थोटेंवर आली. त्यामुळे आयोजनाच्या सर्वच प्रक्रियेत ते वैयक्तिक लक्ष घालू शकले नाही. परिणामी कंत्राटदारानेही मनमानी कारभार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार आल्यानंतरही त्यांनी अपेक्षित यंत्रणा कार्यक्रमास्थळी उभी केली नाही. विशेष म्हणजे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार केली, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्पर्धेच्या उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे संघटनेने थोटेंवर कारवाई करताना या सर्व गोष्टी लक्षात घेण्याची विनंती सीईओंना केली आहे. स्पर्धेच्या जेवणाचे कंत्राट दिलेला चव्हाण नावाच्या कंत्राटदाराची जि.प. पदाधिकारी, सदस्यांशी जवळीक असल्यामुळे कंत्राटदाराकडून झालेल्या चुका दाबल्या जात असल्याचीही चर्चा आहे.