नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकरला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:06 AM2018-04-14T00:06:25+5:302018-04-14T00:06:38+5:30
दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने संतोषला १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मंजूर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने संतोषला १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मंजूर केला.
बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचे कटकारस्थान रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संतोषला आरोपी बनविले होते. त्यात पोलीस अटक करणार, अशी कुणकुण लागताच संतोष फरार झाला होता.
मध्य नागपुरातील अनेक भागात मटक्याचे अड्डे चालविणारा बाल्या गावंडे प्रॉपर्टी डीलिंगच्या नावाखाली जमिनीच्या वादग्रस्त सौद्यात थेट हस्तक्षेप करीत होता. यातूनच तो कुख्यात संतोष आंबेकरच्या जवळ गेला होता. २०१३ मध्ये बडकस चौकाजवळ ११०० फुटाच्या एका वादग्रस्त जमिनीच्या सौद्यात संतोषचे साथीदार असलेल्या प्रॉपर्टी डीलर काळे, ताजणेकर आणि महेश रसाळ या तिघांना मदत केली होती. ही जमीन नंतर एका कापड व्यावसायिकाला एक कोटी रुपयात विकल्यामुळे कमिशन म्हणून बाल्याने या तिघांना २० लाख रुपये मागितले होते. त्यांनी बाल्याला ६ लाख रुपये दिले. उर्वरित १४ लाख रुपये मिळावे म्हणून बाल्या त्यांना धमकावत होता. त्यामुळे संतोषने हस्तक्षेप करून बाल्याला धमकावले होते. त्यावरून संतोष आणि बाल्याचा वाद झाला. तेव्हापासून बाल्या संतोषच्या नावाने ठिकठिकाणी शिवीगाळ करू लागला. संतोषचा गेम करण्याचीही त्याने भाषा वापरली. बाल्या असे करू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले. त्यामुळे त्याने बाल्याला संपवण्याचा कट रचला. बाल्या अवैध धंद्यातून महिन्याला लाखो रुपये मिळवत होता. हे सर्व धंदे त्याचा खास मित्र समजला जाणारा आणि बाल्याला जावई मानणारा कुख्यात गुंड योगेश कुंभारे ऊर्फ सावजी (वय ३०) याला देण्याचे आमिष दाखवून संतोषने सावजीला फितविले. बाल्याच्या हाताखाली काम करून त्याच्या शिव्या खाण्याऐवजी त्याचा गेम करून स्वत:च बाल्याची जागा घेण्याची संधी चालून आल्याने सावजी तयार झाला. त्यानंतर संतोषने माणसांची जुळवाजुळव करून दिली.
कटकारस्थानानुसार, २२ जानेवारी २०१७ च्या रात्रीला सावजीने त्याच्या तुकारामनगर, कळमना येथील घरी ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्यात बाल्याला बोलवून मध्यरात्रीपर्यंत त्याला दारू पाजण्यात आली. तो दारूच्या नशेत टून्न झाल्यानंतर बाल्यावर सावजी आणि त्याचे साथीदार तुटून पडले. तलवारी, चाकूचे घाव घालून सावजी आणि साथीदारांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. कळमना पोलिसांनी या प्रकरणात योगेश कुंभारे ऊर्फ सावजी, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत बोकडे, शुभम धनोरे, जयभारत काळे, महेश रसाळ आणि नवीन ताजनेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडाचे कटकारस्थान संतोष आंबेकरने रचल्याचे पुढे आल्यामुळे पोलिसांनी त्यालाही आरोपी बनविले होते. पोलीस अटक करणार, हे लक्षात आल्याने तो फरार झाला. आता दीड वर्ष झाले मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अचानक गुरुवारी तो वकिलासह न्यायालयात पोहचला. तो आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संतोषची कारागृहात रवानगी करण्यात आली. तेव्हापासून कळमना पोलिसांनी त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अखेर शुक्रवारी दुपारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले. हत्याकांडाशी संबंधित त्याची चौकशी करायची आहे, असे सांगून पोलिसांनी त्याचा न्यायालयातून १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला. या हत्याकांडातील संतोष वगळता सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने आता संतोषला शिक्षा मिळेल, असे कोणते पुरावे पोलीस जमविणार आहेत, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कारागृह, कोर्टात मोठी गर्दी
संतोषने आत्मसमर्पण केल्यापासून नागपूरच नव्हे तर विदर्भाच्या गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. या पार्श्वभूमीवर, संतोषच्या टोळीसोबतच अन्य टोळ्यांचे गुंडही मोठ्या संख्येत दुपारपासून कारागृह आणि कोर्टाच्या परिसरात जमले होते. संतोषसोबत अनेकांनी बोलण्याचे शेकहॅण्ड करण्याचेही प्रयत्न केले. गुंडांची गर्दी ध्यानात घेता पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला होता.