शेराच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नायडूची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:28+5:302021-02-24T04:07:28+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सोमवारी दुपारी लंडन स्ट्रीटजवळ झालेली नीलेश राजेश नायडू (वय ३२) या गुंडाची ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सोमवारी दुपारी लंडन स्ट्रीटजवळ झालेली नीलेश राजेश नायडू (वय ३२) या गुंडाची हत्या म्हणजे दबदबा निर्माण करण्यासाठी बेभान झालेले गुंड आणि त्यांच्या टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादाची परिणती होय. तीन वर्षांपूर्वी खामल्यातील एका बारजवळ शेरा नामक गुंडाची हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी हे हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. या हत्याकांडामुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकारीही बेचैन झाले आहेत.
खामला प्रतापनगरमध्ये गुंडांच्या तीन ते चार मोठ्या टोळ्या आहेत. जुगार अड्डा चालविणे, एमडी विकणे आणि जुगारासोबतच खंडणी वसुलीत ते गुंतले आहेत. अशाच एका टोळीशी संबंधित असलेल्या शेरा नामक गुंडाची तीन वर्षांपूर्वी प्रचंड दहशत होती. त्याचा दरारा संपविण्यासाठी निखिल खरात आणि साथीदारांनी शेराचा एका बारसमोर दिवसाढवळ्या गेम केला होता. खरात आणि टोळीशी संबंधित आरोपींना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल, यासाठी शेराचे साथीदार प्रयत्न करीत होते. त्याची माहिती मिळाल्याने त्यांना अद्दल घडविण्यासाठी विरोधी टोळीच्या गुंडांची कारागृहात आणि बाहेरही खलबतं सुरू होती. या पार्श्वभूमीवर, ‘मै संभाल लेता’ म्हणत शुक्रवारी सायंकाळी नीलेश नायडू कारागृहातून बाहेर आला. शनिवारी आणि रविवारी त्याने आरोपी मयूर शेरेकरच्या मोबाईलच्या दुकानासमोर जाऊन त्याला चमकावण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी नायडू त्याच्या साथीदारासह थेट दुकानात शिरला अन् मयूरची कॉलर ओढून ‘भाई की जमानत क्यू नही होने दे रहा... असे विचारत त्याची चेन ओढली. त्याला गेम कर दूंगा’, अशी धमकीही दिली. नायडू खुनशी वृत्तीचा आहे आणि त्याला शेराच्या हत्याकांडातील आरोपींची साथ आहे, हे लक्षात आल्याने मयूरने लगेच साथीदारांची जमवाजमव केली. त्यानंतर प्लॅनिंगनुसार, आधी एका वाहनाने नायडूचा साथीदार प्रतीक सहारे (रा. पुलगाव, जि. वर्धा) याला उडवण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याची धुलाई केली. प्रतीकने ही बाब नायडूला सांगितली. तिकडे नायडू कामी लागला तर इकडे आधीच तयारी करून त्याच्या मागावर असलेल्या मयूर शेरेकरने सहारेमार्फत मांडवली (सेटलमेंट) करण्यासाठी त्याला निरोप पाठवला. दरम्यान, खामला-जयताळा रिंगरोडच्या बाजूला मैदानात दारू पीत बसलेल्या नायडूला शेरेकर, सागर बग्गा, गोविंद डोंगरे, विशाल गोंडाणे, आशिष बंदेकर आणि सचित चहांदे यांनी गाठले. चाकूचे घाव तसेच रॉडचे फटके हाणून त्यांनी नायडूची हत्या केली. सहारेला पायावर मारून सोडून दिले. दरम्यान, ‘खून का बदला खून’चे स्वरूप असलेल्या या हत्याकांडाने सोनेगाव-खामला- प्रतापनगरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद उघड झाला असून नागरिकात दहशत पसरली आहे.
---
ऑपरेशन क्रॅक डाऊनला गालबोट
या हत्याकांडातून हलगर्जीपणा किती गंभीर ठरतो, ते देखील उघड झाले आहे. गृहमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात गेल्या दोन महिन्यात हत्येच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील गुंडांच्या टोळ्या, सराईत गुंड आणि त्यांच्या साथीदारांची हिटलिस्ट तयार करून मकोका, एमपीडीए, हद्दपारी तसेच प्रतिबंधक कारवाईचा धडाका लावला आहे. कारागृहातून बाहेर आलेला गुन्हेगार मोकाट सुटू नये, त्याला शहरातून हाकला किंवा कारागृहात डांबा, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे. असे असूनही ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायडू आणि त्याचे साथीदार तसेच या हत्याकांडातील आरोपी राहतात, त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नायडू आणि विरोधी टोळीतील गुंडांवर नजर ठेवण्याचे टाळले. येथेच ते चुकले अन् शहरात पुन्हा एक हत्याकांड घडले. यामुळे ऑपरेशन क्रॅक डाऊनला गालबोट लागले आहे.
----
पोलीस आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
या प्रकरणाच्या निमित्ताने संबंधित ठाण्यातील पोलिसांची चूक लक्षात आल्याने पोलीस आयुक्त कमालीचे संतप्त झाले. त्यांनी आज दुपारी सोनेगाव पोलीस ठाणे गाठले अन् आजूबाजूच्या ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही तेथेच बोलवून घेतले. त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली. टाळता येणारे हे हत्याकांड का घडले, असा सवाल करत त्यांनी संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर जोरदार फायरिंग करून त्यांना जाब विचारला.
----