नागपुरात मेडिकलमध्ये अॅडमिशनची थाप, ४० लाखांनी लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:58 PM2019-04-27T20:58:47+5:302019-04-27T21:03:30+5:30
मेडिकलमध्ये पाल्याची अॅडमिशन करून घेण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या नरखेडमधील दोन मित्रांना त्यांच्या मुलांची एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो, असे सांगून एका टोळीने ३६ लाख रुपयांचा गंडा घातला तर, बीएएमएसची अॅडमिशन करून देतो म्हणून मानकापुरातील एका व्यक्तीचे अमरावती जिल्ह्यातील आरोपीने चार लाख रुपये हडपले. २४ तासात गिट्टीखदान तसेच मानकापुरात हे दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये पाल्याची अॅडमिशन करून घेण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या नरखेडमधील दोन मित्रांना त्यांच्या मुलांची एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो, असे सांगून एका टोळीने ३६ लाख रुपयांचा गंडा घातला तर, बीएएमएसची अॅडमिशन करून देतो म्हणून मानकापुरातील एका व्यक्तीचे अमरावती जिल्ह्यातील आरोपीने चार लाख रुपये हडपले. २४ तासात गिट्टीखदान तसेच मानकापुरात हे दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
नरखेड येथील रहिवासी विनोद अंबादास लोखंडे (वय ५६) तसेच त्यांचे मित्र बेले यांना १३ ऑगस्ट २०१८ला आरोपी सुमित सुशिल तिवारी (वय २८, रा. जाफरनगर), निखील गिरीपुजे (वय २४, रा. भंडारा), मोहित, सुजित तिवारी आणि सिंग या पाच जणांनी गाठले. तुमच्या मुलांची एमबीबीएसला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात अॅडमिशन करून देतो, अशी या टोळीतील आरोपींनी थाप मारली. त्यासंबंधाने २०१८ च्या पात्रता परीक्षा (नीट) साठी कागदपत्रे घेऊन महाविद्यालय परिसरात बोलविले. तेथे एमबीबीएस प्रवेशाबाबत माहिती देऊन लोखंडे यांच्या मुलाची तर बेले यांच्या मुलीची कागदपत्रे घेतली. त्यानंतर दोघांनाही महाविद्यालयाच्या नावाने बँकेतून डीडी बनवून घेतले. काही दिवसानंतर तेथे एमबीबीएसची अॅडमिशन झाल्याचे सांगून आरोपींनी त्यांना महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची एक बनावट यादी दाखवली. त्यानंतर लोखंडे आणि बेले यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ३६ लाख रुपये घेतले. पैशांचा व्यवहार गिट्टीखदानमधील फ्र्रेण्डस कॉलनीत असलेल्या जोशी फरसाण (हॉटेल) मध्ये झाला. दरम्यान, विनोद लोखंडे यांनी प्रवेश झाल्याबाबतची कागदपत्रे मागितली असता आरोपींनी त्यांना इंदिरा गांधी महाविद्यालय रुग्णालय नागपूरच्या नावाने बनावट पावत्या दिल्या. तसेच लोखंडे यांच्या मोबाईलवर व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवून लोखंडे तसेच बेले यांच्या मुलामुलीची अॅडमिशन झाल्याचे भासविले. रक्कम दिल्यानंतर बरेच दिवस होऊनही अधिकृत प्रवेशपत्र न मिळाल्याने लोखंडे तसेच बेले यांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींकडे लोखंडे आणि बेलेंनी आपली रक्कम परत मिळावी म्हणून संपर्क केला.
अनेक दिवसांपासून आरोपी टाळाटाळ करीत असल्यामुळे ते रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्याने लोखंडे आणि बेलेंनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, टोळीची चौकशी केली जात आहे.
ओळखीच्यानेच केली दगाबाजी
मानकापुरातील अंजना देवी मंगल कार्यालयाजवळ राहणारे अरुण पुंडलिक खोडे (वय ५३) आणि आरोपी सचिन ज्ञानेश्वर अरबट (वय ३६, रा. वाठोडा, वरुड, जि. अमरावती) यांची जुनी ओळख आहे. खोडे त्यांच्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन मिळावी म्हणून प्रयत्नरत होते. काही दिवसांपूर्वी खोडे यांनी याबाबत आरोपी सचिनकडे विचारणा केली. आरोपी सचिन याने आपली अमरावती येथील डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक महाविद्यालयात ओळख असून, तेथे आपण तुमच्या मुलीची बीएएमएस १५ लाख रुपयांत अॅडमिशन करून देऊ शकतो, असे सांगितले. आरोपी सचिन ओळखीचा असल्यामुळे खोडे यांनी त्याला पहिल्यांदा ४ लाख रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी खोडे यांना टाळू लागला. अॅडमिशनसाठी विचारले असता तो असंबंद्ध उत्तरे देऊ लागला. त्याला ४ लाख परत मागितले असता तेदेखिल तो परत करत नव्हता. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने शुक्रवारी खोडे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सचिनची चौकशी सुरू आहे.