नाना ढाकुलकर लेखनाचा समन्वयवादी प्रवाह
By admin | Published: September 25, 2014 01:33 AM2014-09-25T01:33:41+5:302014-09-25T01:33:41+5:30
साहित्य क्षेत्रातही एक सांस्कृतिक वर्चस्ववादी प्रवाह आहे. ही वर्चस्ववादी वृत्ती इतर लेखकांना कायम परिघावर पाहते आणि त्यांना दुय्यम, तिय्यम ठरवित असते. नाना ढाकुलकरांनाही याच वृत्तीशी
नागपूर : साहित्य क्षेत्रातही एक सांस्कृतिक वर्चस्ववादी प्रवाह आहे. ही वर्चस्ववादी वृत्ती इतर लेखकांना कायम परिघावर पाहते आणि त्यांना दुय्यम, तिय्यम ठरवित असते. नाना ढाकुलकरांनाही याच वृत्तीशी संघर्ष करताना उपेक्षेला सामोरे जावे लागले पण नाना म्हणजे लेखनाचे एक घराणेच आहे. लेखनातला समन्वयवादी प्रवाह म्हणजे नाना ढाकुलकर आहेत, अशी शोकसंवेदना विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.
विदर्भ साहित्य संघ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अ. भा. मराठी नाट्य परिषदेची नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नाटककार नाना ढाकुलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मनोहर म्हैसाळकर तर श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी वामन तेलंग, मदन गडकरी, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते. जोशी म्हणाले, आर्थिक, कौटुंबिक ओढाताणीतून एखाद्या सर्जनशील लेखकाचे काय होते, याचे उदाहरण नाना आहेत. आपल्याच माणसांना आपण किंमत देत नाही, त्यांचे मूल्यमापन करीत नाही, हा वैदर्भीयांचा नतद्रष्टपणा आहे. फुले, आंबेडकरांच्या विचारांचे त्यांचे लेखन अभ्यासण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. प्रमोद भुसारी म्हणाले, नानांच्या नाटकांचा अभ्यास करूनच बरेच काही शिकता आले. प्रमोद मुनघाटे म्हणाले, नाना परिवर्तनवादी, पुरोगामी लेखक होते. त्यांच्या लिखाणात चळवळींचा आशय आहे. प्रफुल्ल फरकासे म्हणाले, त्यांच्या लेखनात तंत्राचे बारकावे लाजवाब आहेत.
मदन गडकरी यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ. शोभणे म्हणाले, नानांनी केवळ नाटक लिहिले नाही तर त्यांनी कथा, कादंबऱ्याही लिहिल्या. रक्षेंद्र ही त्यांची रावणावरची महत्त्वाची कादंबरी आहे पण त्यांचे मूल्यमापन करण्यात आपणच उणे पडलो. समीक्षेने त्यांच्यावर अन्याय केला, हे मान्य करावे लागेल. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.(प्रतिनिधी)