लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनामती संस्था व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृह (वनामती) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २७ एप्रिलला सकाळी ११ वाजता होणार आहे.
सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाणांच्या जातींचे जतन व प्रसार करण्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे. अन्न साक्षरता कार्याक्रमांतर्गत बियाणे महोत्सव, सुरक्षित अन्न परिषदा, शेतकरी क्षमता- निर्मिती कार्यक्रम आणि ग्राहक जागरुकता या उपक्रमांची सूरुवात आहे. शेतकरी, स्वयंसेवी संस्था संशोधक, सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी व पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करुन देणे यामागचा उद्देश आहे. महोत्सव तीन दिवस राहणार असून सरासरी १५ ते २० हजार अभ्यागत भेट देणार आहेत. तीन दिवसीय या बीज महोत्सवात संजय पाटील, रश्मी बक्षी, डॉ. सतीश गोगुलवार,डॉ. मीना शेलगावकर, अंजली महाजन आदी मार्गदर्शन करतील.