प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत सध्या तुंबळ युद्ध रंगल्याची स्थिती आहे. १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेली कोर्टकचेरी, विशेष सभा, विद्यमान अध्यक्षांची हकालपट्टी, हंगामी अध्यक्षांची निवड, पदच्यूत अध्यक्षांकडून हंगामी अध्यक्षांकडे सुत्रे हस्तांतरित करण्यास आनाकानी ते कार्यालयाला पोलिसांचा गराडा असा सारा पट रंगल्याचे दिसून येत आहे. नियामक मंडळ विरुद्ध कार्यकारिणीतील मोजके पदाधिकारी, असा हा सामना आहे. दोन्ही गट एकमेकांना वैध-अवैध असल्याचे म्हणत आहेत.
१७ फेब्रुवारीला धर्मादाय आयुक्तांनी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी विरोधात नियामक मंडळाची बाजू सरस ठरविल्यानंतर १८ फेब्रुवारीला मुंबई कार्यालयात विशेष सभा पार पडली. या सभेत तत्कालिन अध्यक्ष प्रसाद (नवनाथ) कांबळी पदच्यूत करत हंगामी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र २२ फेब्रुवारी रोजी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी गडेकर यांना पत्र पाठवत अध्यक्षपद वैध असल्याचे सिद्ध करा अथवा पोलिसी व कायदेशीर कारवाईस सज्ज रहा, असा दम दिला आहे. २३ डिसेंबर २०२० व १३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या दोन्ही बैठकांना गडेकर गैरहजर असल्याने घटनेनुसार त्यांचे कार्यकारिणी सदस्यत्त्व आधिच रद्द झाल्याने ते अध्यक्षपदी कसे निवडून येऊ शकतात, असा सवाल पोंक्षे यांनी उपस्थित केला आहे; मात्र नियामक मंडळाकडून त्या दोन्ही सभाच अवैध ठरतात, असे जाहीरपणे सांगितले जात आहे. घटनेनुसार कार्यकारिणीच्या सभेत ४ पदाधिकारी व ५ कार्यकारिणी सदस्य हजर असणे गरजेचे असते. ही गणपूर्ती होत नसेल तर ती सभाच वैध ठरत नाही. त्या दोन्ही सभांना अपेक्षित गणपूर्ती नसल्याने गडेकरांचे कार्यकारिणी सभासदत्त्व कसे रद्द होऊ शकते, असा सवाल नियामक मंडळाकडून उपस्थित केला जात आहे.
सुत्रे सोपविण्यास कांबळींचा नकार
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी गडेकर यांनी कांबळी यांना २१ फेब्रुवारी रोजी पत्र पाठविले. त्या अनुषंगाने सोमवारी गडेकर कार्यालयात गेले असता, कांबळी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला. गडेकर यांची नियुक्ती अवैध असल्याचे म्हणत, त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, गडेकरांची अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी कांबळी व गडेकर यांचे सख्य होते. अध्यक्षपदाच्या या भानगडीमुळे दोघांमध्येही वितुष्ट निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पोंक्षे दिशाभूल करत आहेत
शरद पोंक्षे यांचे पत्र म्हणजे सगळ्यांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार होय. गैरहजर राहिल्याने सभासदत्त्व रद्द होते, हे ठीकच. काही सदस्य दोन वर्षांपासून कोणत्याच सभेत नव्हते. त्यांचे सदस्यत्त्व रद्द का केले नाही, शिवाय, गडेकर अध्यक्ष झाल्यावरच पोंक्षे यांना घटना का आठवली? आपले म्हणने दडपशाहीने मांडण्याचाच अट्टहास आहे. गडेकर यांच्या नियुक्तीबाबत धर्मादाय आयुक्तांकडे चेंज रिपोर्ट मंगळवारीच पाठविण्यात आला आहे. आता ही नियुक्ती वैध की अवैध, धर्मादाय आयुक्तच ठरवतील.
- भाऊसाहेब भोईर, प्रवक्ता व नियामक मंडळ सदस्य : अ.भा. मराठी नाट्य परिषद.