राष्ट्रवादीला बंडखोरीने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:23+5:302021-09-24T04:09:23+5:30
श्याम नाडेकर नरखेड : नरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ...
श्याम नाडेकर
नरखेड : नरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी नव्हे ती बंडखोरीची लागण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारी निश्चित असलेल्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. माघारीअंती (दि. २७ रोजी) लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या दोन जिल्हा परिषद सर्कल व दोन पंचायत समिती गणासाठी नरखेड तालुक्यात निवडणूक होत आहे. जुलै महिन्यात स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया मंगळवार २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. २७ सप्टेंबर माघारीची मुदत असून, ५ ऑक्टोबरला मतदान होईल.
तालुक्यात सावरगाव व भिष्णूर या जि.प. सर्कलसाठी आणि बेलोना व सावरगाव पं.स. गणातील रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या चारही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायती समिती निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीत, शिवसेना व भाजपने स्वबळावर लढल्या होत्या . यावेळीसुद्धा तीच स्थिती आहे. राष्ट्रवादीने सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये ओबीसी आरक्षणामुळे अपात्र झालेल्या देवकू पुरोषात्तम बोडखे यांनाच खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिली. येथे जिल्हा परिषदचे माजी सभापती सतीश शिंदे यांनी बंडखोरी करून पत्नी अंजली शिंदे यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपने पारबती काळबांडे, शिवसेनेने ललिता खोडे यांना उमेदवारी दिली आहे, इतर दोन अपक्ष उमेदवार आहेत.
भिष्णूर सर्कलमध्ये दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. राष्ट्रवादीने अपात्र घोषित पूनम जोध यांचे पती प्रवीण जोध यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने नितीन धोटे व शिवसेनेने संजय ढोकणे यांना रिंगणात उतरविले. आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व अपक्षांचा इतर उमेदवारात समावेश आहे.
बेलोना पंचायत समिती गणात अपात्र झालेल्या रश्मी आरघोडे यांना राष्ट्रवादीने नाकारून अपर्णा अरुण भुक्ते यांना उमेदवारी दिल्यामुळे रश्मी आरघोडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने हेमलता सातपुते व शिवसेनेने ललिता कनिरे यांना रिंगणात उतरविले आहे. दोन अपक्षासह पाच उमेदवारांचे अर्ज आहेत.
सावरगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीने उपसभापती वैभव दळवी यांची उमेदवारी निश्चित केली. परंतु सतीश शिंदेसोबतच बंडखोरी करीत प्रवीण वासाडे यांची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने स्वप्निल नागापुरे व शिवसेनेने राजू गिरडकर यांना रिंगणात उतरविले आहे. महत्त्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे असल्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
प्रशासन सज्ज
पोटनिवडणुकीसाठी तालुक्यात प्रशासकीयदृष्ट्याही तयारी करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विशेष दक्षता घेत आहे. त्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली असून, त्यांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे.