योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नीट’च्या महाघोटाळ्यातील सूत्रधार संस्था असलेल्या आर. के. एज्युकेशनचे गैरप्रकार केवळ देशापुरतेच मर्यादित नव्हते. जगातील विविध देशांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या नावावरदेखील अनेकांकडून पैसे उकळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रशिया, चीन, युक्रेनसह सात देशांमध्ये प्रवेश करून देण्याचे आमिष प्रामुख्याने देण्यात यायचे व त्यासाठी वेगळे ‘पॅकेज’देखील होते. या ‘ग्लोबल कनेक्शन’च्या दिशेनेदेखील सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.
आर. के. एज्युकेशनतर्फे नागपुरातील नंदनवन चौकातील वैरागडे कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या माळ्यावर कार्यालय स्थापन करण्यात आले होते. संचालक परिमल कोतपल्लीवार याने येथे काही कर्मचारीदेखील नियुक्त केले होते व प्रामुख्याने विविध शहरांमधील ‘एजंटस्’च्या भरवशावर सर्व खेळ चालायचा. अनेक विद्यार्थ्यांचे विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. याच स्वप्नाचा गैरफायदा उचलण्यासदेखील सुरुवात झाली होती. पालकांना व विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणाचे गाजर दाखविण्यात यायचे. प्रामुख्याने रशिया, युक्रेन, चीन, फिलिपिन्स, जॉर्जिया, कझाकीस्थान, नेपाळ या देशांचा समावेश होता. देशात १ हजार ४४१ हून अधिक विदेशांत ४६७ हून अधिक वैद्यकीय प्रवेश करून दिल्याचा दावा आर. के. एज्युकेशनकडून करण्यात आला होता, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली.
‘कोचिंग क्लास’ नव्हे तर ‘कन्सल्टन्सी’
आर. के. एज्युकेशन असे नाव ऐकून अनेकांना तो ‘कोचिंग क्लास’ असल्याचे वाटायचे; परंतु प्रत्यक्षात ही एक ‘कन्सल्टन्सी’ होती. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अगदी सुरुवातीपासून ते महाविद्यालयात दाखल होईपर्यंत सगळ्यांची जबाबदारी आमची राहील, असे सांगण्यात यायचे. गुणवत्ता नसलेल्या परंतु धनदांडग्या असलेल्या लोकांना नेमके हेच हवे असायचे व त्यातूनच ‘कन्सल्टन्सी’चे फावत होते.
‘ऑनलाईन’ संपर्कावरही होता भर
पालक व विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी परिमल व त्याच्या सहकाऱ्यांकडून ‘ऑनलाईन’ माध्यमांचादेखील वापर करण्यात यायचा. विदेशात प्रवेशासाठी संपूर्ण माहिती देण्यात येईल व समुपदेशन करण्यात येईल, असे म्हणत संवाद सुरू व्हायचा.
नेमके ‘पॅकेज’ कशाचे ?
अतिशय कमी दरांमध्ये देशातील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश करून देण्याचा दावा ‘परिमल’कडून करण्यात यायचा. यासाठी त्याच्याकडून पालकांना विशेष ‘पॅकेज’देखील ‘ऑफर’ करण्यात यायचे. विदर्भातील बहुतांश ‘डीलिंग’ नंदनवनमधील कार्यालयातूनच चालायचे. पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सुरुवातीला एकही पैसा देऊ नका व तुमच्यासाठी स्वस्त ‘पॅकेज’ असल्याचे तो सांगायचा. हे ‘पॅकेज’ प्रवेशपरीक्षेचेच होते की गैरमार्गाने संपूर्ण प्रवेश करून देण्यासाठी होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.