नागपूर : चिनमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याबाबत बोलताना माजी आरोग्यमंत्रीराजेश टोपे म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्रिसुत्री फार्मुला आत्तापासूनच राबविण्याची गरज आहे.
जगात कोरोनाचा नवा व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे. आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे. सोबतच ऑक्सिजन प्लांट उभारले होते, त्याच्या स्थितीचा आढावा घेणे, आयसोलेश वॉर्ड सुरू करणे, औषधांची पूर्तता करणे, आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे. सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
भारत सरकार अलर्ट मोडवर
जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, भारत सरकारने प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या आणि देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असं मी आवाहन करतो.
राज्य सरकारेही सतर्क
आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले आहे की, सर्व राज्यांनी कोविड-19 संक्रमित प्रकरणांचे नमुने अनुक्रमासाठी INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅब (IGSL) कडे पाठवावेत, जेणेकरून नवीन व्हेरिएंट, काही असल्यास, शोधता येतील. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रानंतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही अलर्ट मोडमध्ये आले आहेत.