नीटमध्ये योग्य उत्तराला चुकीचे ठरवले : विद्यार्थ्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 09:24 PM2019-06-18T21:24:07+5:302019-06-18T21:26:13+5:30
गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या नीट परीक्षेमध्ये एका योग्य उत्तराला चुकीचे ठरविण्यात आले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे पाच गुणांचे नुकसान झाले असा दावा गिरीश भिवगडे या विद्यार्थ्याने केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
गेल्या ५ मे रोजी नीट परीक्षा झाली. ३ जून रोजी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. त्यात प्रश्नपत्रिका पी-५ मधील १५२ व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय-१ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ५ जून रोजी सुधारित उत्तरपत्रिका जाहीर करून पर्याय-४ योग्य उत्तर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, निकाल जाहीर झाला व याचिकाकर्त्याला ७२० पैकी ४६५ गुण मिळाले. रसायनशास्त्राच्या अनुभवी शिक्षकांनुसार, पर्याय-१ हेच योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे उत्तर नमूद करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ गुण (उत्तराचे ४ व चुकीच्या उत्तरासाठी कापलेला १ गुण) मिळणे आवश्यक आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासंदर्भात नीट सेलकडे तक्रार करूनही काहीच दिलासा मिळाला नाही असेदेखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारला नोटीस
प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव, नीट सेलचे वरिष्ठ संचालक, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक व राज्य सीईटी सेल यांना नोटीस बजावून यावर २६ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी, केंद्र सरकारतर्फे अॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सीईटी सेलतर्फे अॅड. नहुश खुबाळकर यांनी कामकाज पाहिले.