कोरोना रुग्णसंख्येचा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:45+5:302021-03-27T04:07:45+5:30
नागपूर : वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूने शुक्रवारी दिवसभरात ४,०९५ नव्या रुग्णांचा विक्रम केला. नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या कोरोनाच्या ...
नागपूर : वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूने शुक्रवारी दिवसभरात ४,०९५ नव्या रुग्णांचा विक्रम केला. नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने खाटा अपुऱ्या पडत आहेत. तातडीने खाटा उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. शुक्रवारी ३५ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या २,११,१६२ झाली तर मृतांची संख्या ४,८१९ वर गेली. दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत २३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले.
शासकीय व खासगी रुग्णालये मिळून ऑक्सिजनच्या जवळपास ४,४५१ खाटा उपलब्ध आहेत, परंतु आता चार हजारावर रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. खाटाच उपलब्ध नसल्याने उपचार करणार कोठे आणि इतके मनुष्यबळ आणणार कुठून, अशी विचित्र स्थिती आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १८ सप्टेंबर रोजी २,४३४ हा रुग्णसंख्येचा उच्चांक होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात १६ मार्च रोजी हा उच्चांक मोडीत काढत रुग्णसंख्या २,५८७ वर पोहचली होती. त्यानंतर सलग दोन दिवस रुग्णसंख्येने नवा विक्रम स्थापन केला. १७ मार्च रोजी ३,३७० तर १८ मार्च रोजी ३,७९६ रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यानंतर सात दिवस दैनंदिन रुग्णसंख्या ३००० ते ३७०० दरम्यान होती. परंतु शुक्रवारी रुग्णसंख्येने उसळी घेतल्याने धाकधूक वाढली आहे.
-शहरात २,९६६ तर, ग्रामीणमध्ये १,१२६ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात १७,६२५ चाचण्या झाल्या. यात १३,८०१ आरटीपीसीआर व ३,८२४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २,९६६ तर, ग्रामीणमध्ये १,१२६ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील १८, ग्रामीणमधील १४ आहेत. जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण पॉझिटिव्ह व ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी १,९४३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,६९,४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे होण्याचा हा दर ८०.३ टक्के आहे.
-होम आयसोलेशनमध्ये २८,३४४ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात ३६,९३६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यातील शहरात २७,८५५ तर, ग्रामीणमध्ये ९,०८१ रुग्ण आहेत. २८,३४४ रुग्ण होम आयसोलेशन म्हणजे, गृह विलगीकरणात आहेत. ८,५९२ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत.
-अशी वाढली रुग्णसंख्या
१ मार्च : ८७७
५ मार्च : १,३९३
१० मार्च : १,७१०
१५ मार्च : २,२९७
२० मार्च : ३,६७९
२५ मार्च : ३,५७९
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या : १७,६२५
ए. बाधित रुग्ण : २,११,१६२
सक्रिय रुग्ण : ३६,९३६
बरे झालेले रुग्ण :१,६९,४०७
ए. मृत्यू : ३,८१९