नवमतदारांनो, कर्तव्यांची जाणीव ठेवा; मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
By आनंद डेकाटे | Published: July 15, 2023 05:00 PM2023-07-15T17:00:36+5:302023-07-15T17:03:11+5:30
‘मिशन युवा’ कार्यक्रमाचे उदघाटन
नागपूर : राज्यातील एकूण लोकसंख्येत १८ आणि १९ वर्षे वयोगटातील युवकांचे प्रमाण ५.८ टक्के आहे. मतदार यादीत मात्र हे प्रमाण प्रतिबिंबित होत नसून हे प्रमाण केवळ ०.६८ टक्के आहे. १८ आणि १९ वर्षाच्या युवकांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १५ टक्के आहे. नवमतदारांनी कर्तव्यांची जाणीव ठेवत मतदार म्हणून नावनोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी येथे केले.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील किमान ७५ हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा हे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचे उद्घाटन मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॅा. संजय दुधे, ज्योती आमगे यांच्यासह दिव्यांग आणि तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी, महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. संचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केले तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी मानले.
- मिशन युवा, नागपूरचा उपक्रम : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले, येत्या तीन महिन्यात जिल्ह्यातील किमान ७५ हजार मतदारांची नोंदणी करणे हे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात १८ आणि १९ वर्षे वयोगटातील नावनोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. यासाठी महाविद्यालयीन स्तरावर दोन विद्यार्थ्यांची युवा ॲम्बिसिडर म्हणून नियुक्ती केली जाईल. यासाठी महाविद्यालयांचे सहकार्य घेतले जाईल.
- केवळ बाता नको, मतदान करा ! : विभागीय आयुक्त
लोकशाहीतील मतदान हा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वच मतदारांनी उत्साहाने सहभागी होण्याची गरज आहे. विविध राजकीय विषयांवर आजचा युवा वर्ग चर्चा करताना दिसतो. मात्र, मतदान प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्यामुळे या प्रकियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी केले.