लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या दहा झोन सभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत मनपाच्या १० पैकी ९ झोनमध्ये भाजपच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली. मंगळवारी झोनमध्ये ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने येथे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. तर आसीनगर झोनमध्ये पुन्हा बसपाचा सभापती निवडून आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सभापतींच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी नवनिर्वाचित सभापतींना तुळशीरोप देऊन सत्कार केला. आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...
मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसची माघार
मंगळवारी झोन सभापतिपदासाठी भाजपकडून नगरसेविका प्रमिला मथरानी व काँग्रेसकडून साक्षी राऊत यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु काँग्रेसच्या उमेदवार साक्षी राऊत यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रमिला मथरानी अविरोध निवडून आल्या.
...
आसीनगरात चांदेकर विजयी
आसीनगर झोनच्या सभापती पदासाठी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केले होते. परंतु अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांनी अपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे व बसपाच्या वंदना चांदेकर यांच्यात थेट लढत झाली. कानतोडे यांना तीन तर चांदेकर यांना सहा मते प्राप्त झाली.
...
काँग्रेस तटस्थ
आसीनगर झोनमध्ये अर्ज मागे घेतलेले अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. तर काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, भावना लोणारे अनुपस्थित होते.
...
असे आहेत झोननिहाय सभापती
लक्ष्मीनगर- पल्लवी श्यामकुळे
धरमपेठ-सुनील हिरणवार
हनुमाननगर झोन-कल्पना कुंभलकर
धंतोली - वंदना भगत
नेहरूनगर -स्नेहल बिहारे
गांधीबाग- श्रद्धा पाठक
सतरंजीपुरा- अभिरूची राजगिरे
लकडगंज -मनिषा अतकरे
आसीनगर-वंदना चांदेकर
मंगळवारी-प्रमिला मथरानी
...
भाजप पुन्हा सत्तेत येईल : जाधव
झोन सभापती निवडणुकीत १० पैकी ९ झोनमध्ये भाजपचा विजय झाला. विशेष म्हणजे यात आठ महिला आहेत. भारतीय जनता पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षाचे सर्व नवनिर्वाचित झोन सभापती पार पाडतील. जनतेच्या कायार्ला गती देउन विश्वास सार्थ ठरवितील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात पक्षाचे सर्व नवनिर्वाचित झोन सभापती उत्तम कार्य करतील. २०२२च्या मनपा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी व्यक्त केला.