लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य दिनाची सुटी एंजाॅय करण्यासाठी म्हणून पर्यटनावर जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र यावर्षी विदर्भातील पर्यटनाेत्सवावर विरजण पडले. वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. त्यामध्ये गाेसेखुर्द जलाशयात दाेन सख्ख्या भावांचा, चिखलदऱ्यातील दाेन घटनांत तिघांचा, आसाेलामेंढा (जि. चंद्रपूर) तलावात दाेन मित्रांचा, सालबर्डी (जि. अमरावती) येथे जलालखेडा (जि. नागपूर) येथील तरुणाचा तर गाेंदियातील रावणवाडीतील एकाचा समावेश आहे.
सावली (जि. चंद्रपूर) तालुक्यातील पाथरी येथील आसोलामेंढा तलावाच्या नहरात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना स्वातंत्र्य दिनी दुपारच्या सुमारास घडली. पाथरी येथील सूरज नानाजी नेवारे (वय २०), तर गडचिरोली जिल्ह्यातील बामणी येथील सोनू पितांबर सोरते (२५) अशी मृत तरुणांची नावे आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने आसोलामेंढा पर्यटन सध्या शासनाने बंद केले आहे. मात्र, दोन्ही तरुणांनी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून आठ फूट खोल असलेल्या नहरात उडी घेतली. पाण्याची पातळी व प्रवाह जास्त असल्याने सोनू गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी सूरजने आरडाओरड करीत नहरात उडी मारली. तो प्रवाहातून सोनूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळेस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शिपाई राजू केवट, किशोर वाघमारे, दुर्गेश नन्नावरे व पाथरी येथील युवक विवेक ठाकरे यांनी पाण्यात उडी घेऊन त्या दोघांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दोघांनाही जलसमाधी मिळाली.
चिखलदरा (जि. अमरावती) पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटकांचा जत्रा डोहात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. मित्र बुडाल्याचे पाहून वाचविणाऱ्यांपैकी दोघांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील अंघोळीसाठी डोहात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७, अकोट फैल अकोला) अशी मृतांची नावे आहेत. एमएच-३०/एझेड-४६२६ व एमएच-०४/एफएफ-४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले होते. सर्व मित्र जत्राडोह पॉइंट येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात अंघोळीसाठी उतरले. पैकी दोघे डोहातील खोल पाण्यात बुडाले. सहकारी मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला; पण निष्फळ ठरला. दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात बुडून हरीश जानराव काळमेघ (३८, रा. चौसाळा, तालुका अंजनगाव) याचा मृत्यू झाला.
सालबर्डी येथील हत्तीडाेहात बुडून विशाल राजेंद्र कांबळे (२१, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) या तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. याशिवाय गाेंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रजेगाव घाट येथे कावड यात्रेत सहभागी असलेल्या भाविकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. प्रमोद वंजारी (३६, रा. रजेगाव) असे मृताचे नाव आहे.
सेल्फीच्या नादात सख्खे भाऊ बुडाले
मित्रांसोबत गोसेखुर्द धरणावर आलेल्या उमरेड (जि. नागपूर) येथील दोन सख्ख्या भावंडांचा सेल्फी काढताना वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. मंगेश मधुकर जुनघरे (वय ३७) व विनोद मधुकर जुनघरे (३५, दोघेही रा. रेवतकर ले आउट उमरेड, जि. नागपूर) येथील रहिवासी आहेत. नदीच्या काठावर बसून सेल्फी काढत असताना विनोदचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. खोल व पाण्याला प्रवाह जास्त असल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. लहान भाऊ पाण्यात पडून बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ मंगेश याने जिवाची पर्वा न करता वैनगंगेच्या पात्रात उडी घेतली. मात्र, मंगेश विनोदचा आणि स्वत:चाही जीव वाचवू शकला नाही. वैनगंगेच्या पात्रात दोन्ही भावंडांना जलसमाधी मिळाली.