नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा झालेल्या खुन्यांना ३ मार्च रोजी फाशी देण्यासाठी नवे ‘डेथ वॉरन्ट’ जारी झाल्यापासून त्यांचे वर्तन आक्रमक झाल्याचे तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांना जाणवत आहे. हे खुनी फाशी टळावी यासाठी गंभीर आजारपण यावे किंवा इजा व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.
फासावर लटविले जाणार असलेल्या व्यक्तीमध्ये, फाशीचा दिवस जवळ येताच आत्मघाताच्या प्रवृत्ती प्रबळ होणे काही नवीन नाही. ‘निर्भया’चे खुनीही सध्या तशाच मानसिकतेत असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावर पूर्वीपेक्षा अधिक कडक नजर ठेवली जात आहे. चौघा खुन्यांच्या कोठड्यांबाहेर अहोरात्र जागता पहारा ठेवला आहे. त्यांच्या कोठडीत स्वच्छ प्रकाशाची व्यवस्था केली असून तेथील सीसीटीव्हीच्या फूटेजचेही सतत निरीक्षण केले जात आहे. या चौघांविषयी अन्य कैद्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होऊ नये, यासाठी त्यांचा इतरांशी संपर्क अगदी कमी केला जात आहे. सोमवारी घडलेली घटना या खुन्यांच्या सध्याच्या मानसिकतेचे ताजे उदाहरण आहे.