विधानसभेत गोंधळ, राजदंड पळविण्याच्या झटापटीत मार्शल व आमदार खाली पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:35 PM2018-07-11T15:35:11+5:302018-07-11T15:38:59+5:30
नाणार प्रकल्पाला विरोध करत आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पावरून काँग्रेसचे नीतेश राणे व शिवसेनेच्या आमदार बुधवारी विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांसमोर ठेवलेला राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित मार्शलने राजदंड घट्ट धरून ठेवला. या झटापटीत काही आमदार व मार्शल खाली पडले. एकच गोंधळ निर्माण झाल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहाबाहेरही नारेबाजी करीत मोर्चा काढला.
नाणार प्रकल्पाच्या विरोधात बुधवारी नागरिकांनी बुधवारी अधिवशनावर मोर्चा काढला. त्याबाबत सभागृहात दोन शब्द बोलू देण्याची विनंती शिवसेनेच्या सदस्यांनी केली. परंतु, विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर उत्तर सुरू असल्याने अगोदर मंत्र्यांचे उत्तर होऊन जाऊ द्या नंतर बोला, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. यावरून शिवसेना सदस्य नाराज झाले. सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सदस्यांनी नारेबाजी सुरू केली. नाणार-जाणार अशा घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. दरम्यान काँग्रेसने या विषयावर स्थगन प्रस्ताव सादर केल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्र्यांच्या उत्तरानंतर स्थगन प्रस्ताव सादर होईल, असे अध्यक्ष बागडे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे शिवसेना सदस्य आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांची नारेबाजी सुरूच होती. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५-१५ मिनिटांसाठी तीन वेळा व १० मिनिटांसाठी एक वेळा तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू होताच शिवसेना सदस्य बॅनर घेऊन घोषणा देत अध्यक्षांच्या आसनासमोर आले. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. काँगेसचे नितेश राणे हे थेट सभापतींच्या समोर ठेवलेल्या राजदंडापर्यंत पोहचले. काही क्षणातच प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आणि राजेंद्र साळवी सुद्धा अध्यक्षांच्या आसनाजवळ पोहोचले. सर्व आमदारांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभेतील दोन मार्शल मात्र त्यांच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी राजदंड धरून ठेवला. त्यांच्या हातातून सहा आमदारांनी राजदंड हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्शल्सनी त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. या झटापटीत मार्शल आणि आमदारही खाली पडले. या गोंधळामुळे अध्यक्ष बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
नाणार प्रकल्प होऊ देणार नाही
कोकणातील जनता नाणार प्रकल्पाच्या विरोधात आहे. त्यामुळे शिवसेनाही सुरुवातीपासूनच या प्रकल्पाच्या विरोधात आहे. तो आम्ही होऊ देणार नाही. नाणारच्या विरोधात नागरिकांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा व्हावी, आम्हाला बोलू द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. परंतु, त्यावर चर्चा न करता अध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवू पाहात होते. अध्यक्षांनी परवानगी न दिल्याने राजदंड उचलून आम्ही आमचा विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केल्याचे शिवसेना आमदार राजेंद्र साळवी यांनी म्हटले.
शिवसेनेची नाटकं जनतेला माहिती आहेत
मी कोकणचा आहे. नाणार प्रकल्पामुळे तेथील जनजीवन प्रभावित होणार असल्याने जनतेचा विरोध आहे. आम्ही जनतेसोबत आहोत. याविरुद्ध सर्वात पहिल्यांदा मीच राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. मी पुढे सरसावल्याचे पाहून शिवसेनेच्या आमदारांना जाग आली व तेही पाठोपाठ तिथे पोहोचले. सत्तेत वाटेकरी असलेली शिवसेना राजदंड कशी पळवू शकते. शिवसेनेची नाटकं कोकणातील जनतेला माहिती आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले.