लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठांमधील वाढते राजकारण ही बाब चिंताजनक आहे. विद्यापीठे सरस्वतीची मंदिरे आहेत. याला राजकारणाचा आखाडा करण्याची आवश्यकता नाही. देशनिर्माणात विद्यापीठांची मौलिक भूमिका आहे. त्यामुळे विद्यापीठांत केवळ अध्ययन, अध्यापन, संशोधन व्हायला हवे. राजकारण करायचे असेल तर ते बाहेर करावे, असे स्पष्ट मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नादर हे सन्माननीय अतिथी होते. विद्यापीठांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला पाहिजे. यासंदर्भात कुठलीही तडजोड होता कामा नये. जर एखाद्या महाविद्यालयाने गुणवत्ता राखली नाही, तर कठोर कारवाई झाली पाहिजे. शिवाय जो काम करत नाही, त्याला बाहेर काढले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे बदल व उद्योगक्षेत्राची मागणी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांतदेखील बदल झाले पाहिजेत. भविष्याची गरज लक्षात घेतली पाहिजे. सद्यस्थितीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या तुलनेत खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी जास्त चांगल्या पद्धतीने गुणवत्ता कायम ठेवली आहे, असे प्रतिपादनदेखील गडकरी यांनी केले. शिव नादर यांनी आपल्या भाषणात त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगितले. आजच्या काळात ज्ञान सतत ग्रहण करायला हवे. स्वत:ला नेहमी ‘अपडेट’ ठेवणे आवश्यक आहे, असे शिव नादर यांनी सांगितले. ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळवून राहू, असा विश्वास कुलगुरुंंंंनी व्यक्त केला. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांच्यासह चार विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य हेदेखील उपस्थित होते.नागपूर विद्यापीठाने विदर्भाचे ‘ग्रोथ इंजिन’ व्हावेविदर्भाच्या विकासाची जबाबदारी विद्यापीठे व विद्यार्थ्यांकडेदेखील आहे. विदर्भात येणाऱ्या उद्योगांना संशोधकांनी मदत केली पाहिजे. त्यातूनच विदर्भात उद्योगांची संधी वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे व विदर्भ विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.‘एचसीएल’ नागपुरातून जाणार होतेरोजगारवाढीसाठी नवीन उद्योगांसोबतच उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. सोबतच रोजगार निर्माणासाठी गुंतवणूक झाली पाहिजे. नागपुरात ‘एचएसीएल’ने जमीन खरेदी केली होती. काही काळाने शिव नादर यांनी नागपुरात ‘एचसीएल’चे ‘युनिट’ सुरू करु इच्छित नाही असे सांगितले. मात्र सरकार ‘एचसीएल’ला सर्वप्रकारे मदत करेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यानंतर ‘एचसीएल’ने नागपुरात प्रकल्प सुरू केला, असे गडकरी यांनी सांगितले.विद्यार्थिनींचेच वर्चस्वनागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत सोहळ्यात पदकविजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच वर्चस्व दिसून आले. दीक्षांत समारंभात हिवाळी २०१७ व २०१८ च्या उन्हाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५४ हजार १४२ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध परीक्षांमधील १०३ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १५६ सुवर्ण पदके, ९ रौप्य पदके, १७ पारितोषिके अशी एकूण १८२ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.
दीक्षांत समारंभत डॉ.आनंद भोळे यांना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ‘डीएस्सी’ ही पदवी देण्यात आली.राघव भांदक्करला सर्वाधिक पदकेविद्यापीठाद्वारे संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील ‘एलएलबी’चा (पाच वर्षीय अभ्यासक्रम) विद्यार्थी राघव अनिरुद्ध भांदक्कर याला सर्वाधिक सात पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.त्यापाठोपाठ जी.एस.वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी इशा गिडवानी (एमबीए) तसेच विद्यापीठाच्याच डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचा विद्यार्थी मंगेश मेश्राम (एमए-आंबेडकर विचारधारा) यांचा प्रत्येकी सहा पदके-पारितोषिकांनी सन्मान झाला. तर पाच पदके-पारितोषिकांसह महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सप्तश्रृंगी मोरसकर (एमए-मराठी) व विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाची विद्यार्थिनी मुनमुन सिन्हा (एमएड) यांना सन्मानित करण्यात आले.समाजाला जोडण्याचे लक्ष्य : राघव भांदक्कर ‘बीएएलएलबी’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या राघव भांदक्करला सात पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. माझ्या आईवडिलांची स्वप्नपूर्ती झाली आहे. कुटुंबात विधी क्षेत्रातीलच वातावरण आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेच मी तयारी केली होती. वकिलीच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करून सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करेल, असे त्याने सांगितले.माझे वडीलच माझे आदर्श : मोरसकर ‘एमए’ मराठी सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त करत पाच पदके व पारितोषिके मिळविणाऱ्या सप्तशृृंगी शिरीष मोरसकरने आपल्या यशाचे श्रेय वडील व कुटुंबीयांना दिले आहे. मला भविष्यात प्राध्यापक बनायचे आहे. ‘नेट’ व त्यानंतर ‘पीएचडी’ करायचे आहे. कुठल्याही विषयात यश मिळविण्यासाठी संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत. माझे वडीलच माझे आदर्श आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले : मोनिका अक्केवार जनसंवादमध्ये ‘टॉप’ करणाऱ्या मोनिका अक्केवार हिने खडतर परिस्थितीत यश मिळविले. परीक्षेच्या एक महिन्याअगोदर तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या वेळी मोनिका दवाखान्यात त्यांच्या शेजारी बसून अभ्यास करत होती. माझे वडील पत्रकार बनू इच्छित होते. मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले, असे सांगताना मोनिकाचे डोळे पाणावले होते. मूळची गडचिरोली येथील मोनिका ही एका वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून कार्यरत आहे.‘मार्केटिंग’मध्ये करायचेय ‘पीएचडी’ : ईशू गिडवानी ‘एमबीए’त सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या ईशू गिडवानी हिचा सहा पदके-पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. माझ्या यशाचे सर्व श्रेय शिक्षक व कुटुंबीयांना जाते. मला उद्योगक्षेत्रात जास्त रुची आहे. ‘मार्केटिंग’मध्ये मला ‘पीएचडी’ करायची आहे. यासाठी तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले.बाबासाहेबांच्या अर्थनीतीचा जागर करायचाय : मंगेश मेश्राम डॉ.आंबेडकर विचारधारेत सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त करणाऱ्या मंगेश मेश्राम याचा सहा पदके-पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक नीतीने प्रभावित झालो आहे. बाबासाहेब एक महान अर्थशास्त्रज्ञदेखील होते. मात्र त्यांची अर्थनीती लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. याचाच मला समाजात जागर करायचा आहे, असे त्याने सांगितले.पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार हवा : मुनमुन सिन्हा मुनमुन सिन्हा हिचा ‘एमएड’मध्ये सर्वात जास्त ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल पाच पदके-पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. मुनमुनने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत हे यश मिळविले. अगोदर विचार केला नव्हता. मात्र नंतर अभ्यासाच्या इच्छेमुळे नवी ऊर्जा मिळाली. भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी काम करायचे आहे. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत तिने व्यक्त केले.