लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाची सूत्रे मंगळवारी आपल्या हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लघु उद्योगांच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा दर व रोजगार वाढविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.याप्रसंगी विभागाचे सचिव डॉ. अरुणकुमार पांडा यांनी गडकरी यांचे स्वागत केले. विभागाचे राज्य मंत्री प्रतापचंद्र सारंगी व श्रीमती कांचन गडकरी यावेळी उपस्थित होत्या.नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी आपल्या कार्यप्रणालीविषयी सविस्तर विवेचन केले होते. त्यात त्यांनी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते माझ्यासाठी तुलनेने नवीन आहे. मात्र देशाच्या विकासात या उद्योगांचा मोठा वाटा आहे. एका अर्थाने हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहेत. या उद्योगांवर देशाचा विकासदर अवलंबून आहे. या खात्याचा व्याप खूप मोठा आहे. या उद्योगांच्या उत्पादनांची निर्यात वाढली पाहिजे. मात्र या विभागात काम करीत असताना ग्रामीण भाग व कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीला माझे प्राधान्य असेल. अद्याप मी निश्चित टार्गेट ठरविलेले नाही. मात्र रोजगार निर्मितीचे यावर्षीचे आकडे नक्कीच बदललेले दिसतील.देशभरात राष्ट्रीय महामार्गांची कामे जोरात सुरू आहेत. मुंबई-दिल्ली महामार्गाचे ६० टक्के कामांचे वाटपदेखील झाले आहे. २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार. हा जगातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग ठरेल; सोबतच आपल्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढेच म्हणजे १२५ कोटी वृक्ष देशातील महामार्गांच्या कडेला लावण्यात येतील. देशातील महामार्गांच्या बांधकामाचा वेग ३२ किलोमीटर दर दिवस असा आहे. येत्या काळात हा वेग आणखी वाढेले. मला जी खाती मिळाली, ती चांगलीच आहेत. देशासमोर रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे.
नितीन गडकरी यांनी हाती घेतली मंत्रालयांची सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:03 PM