बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:53 AM2020-07-05T04:53:29+5:302020-07-05T04:54:18+5:30
मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे.
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व भाजप यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात आता राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी उडी घेतली आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला आपले बिंग फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अख्खी भाजप मुंढे यांना लक्ष्य करीत आहेत, अशी टीका करीत राऊत यांनी मुंढे यांची उघड पाठराखण केली आहे.
राऊत म्हणाले, मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे. मुंढे हे प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत आहेत. ते ज्या शहरात जातात तेथे आपले प्रशासकीय कसब वापरून त्या शहराच्या विकासासाठी काम करतात. ते कुठल्याही व्यक्तिगत हितासाठी काम करत नाहीत. नागपुरात त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
शहराच्या विकासाला गती देण्यासाठीच त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या एका पक्षाने नागपुरात आणले अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
सीईओ म्हणून नियुक्ती वैधच : स्मार्ट सिटीच्या संदर्भात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांची पोलिसात तक्रार केली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. मात्र, या दोन्ही तक्रारीत तथ्य नाही. सीईओच्या रिक्तपदी नियुक्ती करण्याचे अधिकार त्या मंडळाला आहेत. त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आहेत. त्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून पालिकेच्या आयुक्तांना अधिकार दिले. त्यामुळे स्मार्ट सिटीचा कारभार ते पाहात आहेत. सीईओची नियमित नियुक्ती करण्यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.