लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करता प्रकल्पातील मृत साठा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.प्रकल्पातील जिवंत साठा संपल्यानंतर मृत साठा वापरण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठविले होते. यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मृत साठा वापरण्याची परवानगी देण्याबाबत विनंती केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृत जलसाठा वापरण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली. शहराला पाणीपुरवठा होणाºया नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा हा १० जूनपर्यंतच पुरेल इतका आहे. सोमवारी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट देऊ न पाणीसाठ्याची माहिती घेतली. मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याला मंजुरी देण्याची मागणी केली.चौराई प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणीमध्य प्रदेशातील चौराई धरणात पाणी अडविल्याने गेल्या पावसाळ्यात पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारशी संपर्क साधून चौराई धरणातून पेंच प्रकल्पात पाणी सोडावे, अशी विनंतीही महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.५० कोटी खर्चून जलवाहिनी टाकणारसिंचन विभागातर्फे पेंच प्रकल्पातून सुमारे ७५ क्यूसेक्स पाणी कन्हान पाणी पुरवठा केंद्राला देण्यात येते. मात्र कालव्याव्दारे पाणी सोडले जात असल्याने पाणीपुरवठा केंद्रापर्यंत तेवढे पाणी येत नाही. याचा विचार करता पाईपलाईनने पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी जलप्रदाय विभागाला दिले. वेळोवेळी वीज जात असल्यामुळेही पाणी पुरवठ्यात मोठा अडसर निर्माण होतो. यासाठी आता ११ के.व्ही . क्षमतेच्या नवीन एक्स्प्रेस फीडरचा प्रस्तावही तयार करण्यात आल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
तर मनपा मृत जलसाठा वापरणार : राज्य सरकारची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 9:34 PM
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करता प्रकल्पातील मृत साठा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देनागपूरकरांना दिलासा