ना ‘मास्क’, ना ‘सोशल डिस्टन्सिंग’..हे कसे स्वागत; अभाविप कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 10:30 AM2021-02-17T10:30:24+5:302021-02-17T10:31:50+5:30
Nagpur News अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र ,‘कोरोना’चा प्रभाव वाढत असताना अतिउत्साहात कार्यकर्त्यांना ‘मास्क’ लावणे किंवा ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचे भानदेखील उरले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमधील प्रत्यक्ष वर्गांनादेखील सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र ,‘कोरोना’चा प्रभाव वाढत असताना अतिउत्साहात कार्यकर्त्यांना ‘मास्क’ लावणे किंवा ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचे भानदेखील उरले नाही. त्यामुळे ‘हे कसे स्वागत’ असा सवाल नवीन विद्यार्थ्यांकडूनच उपस्थित करण्यात आला.
अनेक महिन्यांनंतर विद्यार्थी ‘कॅम्पस’मध्ये परतले. याशिवाय प्रथम सत्राला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तर उत्साह आहेच. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या दृष्टीने ‘अभाविप’ने पुढाकार घेतला व प्रवेशद्वारावर मोठा स्वागतफलकदेखील लावला. येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारावरच फुले व हाराने स्वागत करण्यात येत होते. मात्र, असे करत असताना अनेक कार्यकर्त्यांनी ‘मास्क’ घातले नव्हते. याशिवाय ‘सोशल डिस्टन्सिंग’देखील पाळण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रत्यक्षात ‘कोरोना’ची संख्या परत वाढीस लागली असताना विद्यार्थी संघटनांनी जबाबदारीने वागायला हवे. स्वागत करणे ठीक आहे. मात्र, त्यात नियमांचा भंग होता कामा नये. उलट या संघटनांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका विभागप्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.