एसटी बसमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:07 AM2021-06-24T04:07:00+5:302021-06-24T04:07:00+5:30
चालक-वाहकही विनामास्क : कसा वाढणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूर : अनलॉकनंतर एसटी बस पूर्ण क्षमतेने धावत आहेत. बस सुरू ...
चालक-वाहकही विनामास्क : कसा वाढणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव
नागपूर : अनलॉकनंतर एसटी बस पूर्ण क्षमतेने धावत आहेत. बस सुरू करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु बसस्थानकावर कोरोनाच्या नियमांचे पालनच होत नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. नागपूरमार्गे धावणाऱ्या सावनेर-अहेरी या बसमध्ये प्रवास केला असता, बहुतांश प्रवाशांनी मास्क घातले नसल्याचे दिसले.
एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु बसस्थानकावर कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसून आले. बसस्थानकावर बसलेले बहुतांश प्रवाशी मास्क घातलेले नव्हते. प्रवाशीच काय तर एसटीचे चालक-वाहकही विनामास्क फिरताना आढळले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु प्रवाशांनी अशीच नियमांची पायमल्ली केल्यास रुग्णांचा कमी होत असलेला आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
.........
‘लोकमत’चा नागपूर-चंद्रपूर प्रवास
वेळ दुपारी ४ वाजता
प्रवाशी ४२
बुटीबोरी
नागपूरवरून बस सुटल्यानंतर पहिला थांबा बुटीबोरी येथे बस थांबली. बसमधून १२ प्रवाशी खाली उतरले, तर ८ प्रवाशी बसमध्ये चढले. बसमध्ये चढणाऱ्या ५ प्रवाशांनी मास्क घातलेले नव्हते.
जाम
जाम येथे १५ प्रवाशी गाडीखाली उतरले आणि १० प्रवाशी बसमध्ये चढले. १० पैकी ४ प्रवाशी विनामास्क होते; परंतु त्यांना वाहकाने हटकले नाही. त्यामुळे एसटी बसमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसले.
नंदुरी
नंदुरी येथे १४ प्रवाशी गाडीखाली उतरले तर १६ प्रवाशी बसमध्ये चढले. यातील ९ प्रवाशांनी मास्क घातलेले नव्हते. खबरदारी म्हणून सीटवर बसण्यापूर्वी प्रवाशी सॅनिटायझरचा वापरही करताना दिसले नाहीत.
खांबाळा
खांबाळा येथे ८ प्रवाशी गाडीखाली उतरले आणि १० प्रवाशी बसमध्ये चढले. यातील ४ प्रवाशांनी मास्क घातलेले नव्हते. गाडीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आली.
चालक विनामास्क
सावनेर-अहेरी या बसचा चालक मास्क घातलेला नव्हता. चालकाचा प्रवाशांशी तसा थेट संपर्क येत नाही. परंतु खबरदारी म्हणून मास्क घालणे गरजेचे आहे. परंतु या बसच्या चालकाने मास्क घातलेला नसल्याचे दिसले.
वाहकाकडूनही नियमाचे उल्लंघन
संपूर्ण प्रवासात सावनेर-अहेरी या बसच्या वाहकाने मास्क घातला होता. परंतु हा मास्क हनुवटीच्या खाली उतरविलेला होता. त्याच अवस्थेत तो प्रवाशांना तिकीट देत होता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होणार नाही, असा प्रश्न पडला.
प्रवाशीही बिनधास्त
नागपूरमार्गे धावणाऱ्या सावनेर-अहेरी या बसमध्ये प्रवाशी बिनधास्तपणे वागत असल्याची बाब दृष्टीस पडली. सीटवर बसण्यापूर्वी कोणताच प्रवाशी सीटचे सॅनिटायझेशन करीत नव्हता, तर अर्ध्या प्रवाशांच्या तोंडावर मास्क घातलेले दिसले नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही या बसमध्ये फज्जा उडाल्याची बाब दिसून आली.
.............