मुलीच्या दुधासाठी पैसे नाही, गावी काय नेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 01:47 AM2020-05-16T01:47:00+5:302020-05-16T01:49:39+5:30
सहा महिन्यांच्या जुळ्या मुली आणि पत्नीला घेऊन अर्जुनप्रसाद कुशवाह सर्व राहुटीच्या सामानासह जबलपूरला जाण्यासाठी निघाले. मुलींच्या दुधाच्या बॉटलमध्ये चक्क पाणी भरले होते. आम्ही विचारले तेव्हा डोळ्यात पाणी आणत तो बोलला, दोन महिन्यापासून खाली बसलो आहे. वाचलेले ५०० रु. घेऊन गावाकडे निघालो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा महिन्यांच्या जुळ्या मुली आणि पत्नीला घेऊन अर्जुनप्रसाद कुशवाह सर्व राहुटीच्या सामानासह जबलपूरला जाण्यासाठी निघाले. मुलींच्या दुधाच्या बॉटलमध्ये चक्क पाणी भरले होते. आम्ही विचारले तेव्हा डोळ्यात पाणी आणत तो बोलला, दोन महिन्यापासून खाली बसलो आहे. वाचलेले ५०० रु. घेऊन गावाकडे निघालो आहे.
पांजरी नाक्याजवळ स्टारबसमध्ये बसून ते रेल्वे स्टेशनला पोहचले. अर्जुनप्रसाद बुटीबोरीच्या एमआयडीसीतील एका कंपनीत तीन वर्षांपासून काम करीत होते. टाकळघाटजवळ एका गावात भाड्याने राहत होते. सहा महिन्यांपूर्वी पत्नीने जुळ्या मुलींना जन्म दिला. १५००० रु. पगार मिळायचा. या तुटपुंज्या पगारात समाधानाने सर्व सुरळीत चालले होते. यातून गावी राहणाऱ्या आईवडील व भावंडानाही मदत पोहचायची. मात्र लॉकडाऊनमुळे कंपनी बंद झाली. आज उद्या करीत दोन महिने गेले. कंपनी सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही, असे पाहून हे कुटुंब परतीला निघाले. मालकाकडे मार्च महिन्याचा पगार बाकी आहे. त्यातील ३००० रु. गावी जाण्यासाठी दिले. त्यातले २५०० रु खोलीचे भाडे देण्यात गेले आणि ५०० रु. घेऊन ते गावाच्या दिशेने लागले. आठ दिवस एकाच वेळचे जेवण केल्याचे त्यांनी सांगितले. ट्रेन सुरू झाली म्हणून बरे झाल्याची भावना व्यक्त केली. प्रवासात अडचण येऊ नये म्हणून दूध घेतले नाही की सामान घेतले नाही. नाक्याजवळ मिळालेल्या जेवणाने तेव्हाची भूक भागली. आता रस्त्यात पाहू, असा विचार करून त्यांचा प्रवास सुरु झाला. नाक्याजवळच्या मदत केंद्रातून मुलींसाठी दूध आणि इतर गरजेचे साहित्य देत त्यांना रवाना करण्यात आले. पण आलेली परिस्थिती आयुष्यात विसरणे कठीण, अशी वेदनादायक व्यथा त्यांच्या बोलण्यात होती.