लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदीप जोशी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. यामुळेच ते शहरातील प्रमुख बाजार भागात दौरा करून नागरिक व व्यापाऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आतापर्यंत इतवारी, महाल, खामला, देवनगर येथील प्रमुख बाजारांची पाहणी केली. मंगळवारी गोकुळपेठ बाजाराचा दौरा करून नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे समर्थन त्यांनी केले. काही दुकानदार व नागरिक बेजबाबदार वागत असल्याचे निदर्शनास आले. मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपकडून महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे पाच हजार रुपये दंड वसूल केला.बाजारातील परिस्थिती व लॉकडाऊनची आवश्यकता यासंदर्भात लोकमतने महापौर संदीप जोशी यांच्याशी चर्चा केली. जोशी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागायला नको. आधीच गरीब व मध्यमवर्गीय लोकांची कंबर मोडली आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. लोकांचे दु:ख जाणतो. कोविडवर अंकुश ठेवायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रशासनाला यासंदर्भात सतर्कता दाखवावी लागेल. शिस्तीत नियमांचे पालन केले तर तसेही आपण कोविड संक्रमणाला रोखू शकतो.शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केला तर शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येईल. आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून नियमांचे कठोरतेने पालन करावे, अशी मागणी करणार असल्याचे संदीप जोशी म्हणाले. बाजारात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दुचाकीवर दोन वा तीन जण फिरत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर करवाई करावी. गरज भासल्यास बळाचा वापर करावा.लॉकडाऊनमुळे व्यापारीही अडचणीत आहेत. त्यांना दुकान उघडण्याची घाई आहे. असे असले तरी संक्रमण रोखण्यासाठी सम-विषम दिवसाला दुकान सुरू ठेवावे. नियमांचे पालन करावे, असेही महापौरांनी सांगितले.
लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:07 AM