लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अंबाझरी तलावाच्या वाईट अवस्थेवर न्यायालयाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (व्हीआयडीसी) चे कार्यकारी संचालक, महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने याबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने २३ नोव्हेंबरपूर्वी शपथपत्र दाखल करून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
१५० पेक्षा अधिक वर्षे जुने असलेल्या अंबाझरी तलावाच्या भिंतीला तडे जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी तलावाची स्थिती समोर आणली होती. या वृत्ताची दखल घेत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे विनोद तिवारी, डॉ. एस. टी. सांगले यांनी जनहित याचिका दाखल केली होती. २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेला अंबाझरी तलाव नागपूरचे भूषण आहे. धरणाची लांबी जवळपास ९३० मीटर व स्पीलवे हा १४० मीटरचा आहे. या तलावाची उंची ही ११ मीटर आहे. १४ किमी कॅचमेन्ट असलेला हा तलाव पाण्याने नेहमीच भरलेला असतो. तलावाच्या सुरक्षा भिंतीला व स्पीलवेच्या पुरातन बांधकामाला तडे गेले आहेत. लोकमतच्या बातमीनंतर महापौर तसेच मनपा अधिकारी व प्राधिकरणाच्या सदस्यांनी दौरा करून पाहणी केली होती.
तलावाचे बांधकाम जीर्ण अवस्थेत पाहेचले आहे. तलावाची पार व त्याखालून पाणी झिरपत असल्याचे दिसते. ते फुटले तर जवळपासचा परिसर जलमय होईल आणि दुसरीकडे तलावाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे डागडुजी करून तलाव मजबूत करण्याची गरज आहे. आजही शेकडो लोक अंबाझरी तलावावर फिरण्यासाठी येत असतात. शिवाय स्वामी विवेकानंदाचे स्मारक उभारल्याने वैभवात भर पडली आहे. मात्र आणखी विकास केल्यास हे एक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येऊ शकते, अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली आहे.